सध्याची परिस्थिती ही वाईट आहे. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आणखी वाईट केले नाही हे खूप चांगले केले. उत्पन्न कमी झाले तर खर्च कमी करावा त्याप्रमाणे मागील वर्षे ६५ हजार कोटींनी उत्पन्न कमी झाल्याने या वर्षी अर्थमंत्र्यांनी खर्चाला कात्री लावली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले आहे. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने डॉ. गोविलकर यांचे केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे आदी उपस्थित होते. बेळे यांनी प्रास्तविकात केंद्रीय अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत, कोणते आर्थिक बदल होऊ शकतात, उद्योगांशी संबंधित काय बदल झाले, प्रगती कशी असेल, याबाबतची माहिती देण्यात येईल, असे सांगितले. डॉ. गोविलकर यांनी या वर्षी कर उत्पन्न एक लाख ४० हजार कोटींनी अपेक्षित असल्याचे नमूद केले. वाढलेली रक्कम मिळण्यासाठी अतिरिक्त कर लावणे अथवा कशा प्रकारे ती मिळवता येईल हे स्पष्ट नाही. मागील वर्षांप्रमाणे या वर्षी कर उत्पन्न कमी होणार आहे. मंदी म्हणजे काय, त्यातून बाहेर कसे पडायला पाहिजे हे स्पष्ट केले. महिलांसाठी निर्भया फंड, स्वतंत्र बँक याबाबतही डॉ. गोविलकर यांनी माहिती दिली.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी शासनावर कुठलाही बोजा टाकला नाही हे त्यांचे कौशल्य आहे. प्राप्ती करात फार बदल झालेले नाहीत. १०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना १५ टक्के गुंतवणूक भत्ता मिळणार आहे.
परंतु ती गुंतवणूक १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा