वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या दोन मेट्रो मार्गाच्या खर्चाचा फेरआढावा घेण्यात आला असून सन २०१४ ते १९ या कालावधीचा विचार करता मेट्रोच्या या दोन मार्गासाठी १० हजार ४०१ कोटी रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. प्रकल्प लांबल्यामुळे मूळ खर्चात दोन हजार कोटींची वाढ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मेट्रोच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या महिन्यात दोन बैठका घेतल्या. आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकात मेट्रोसाठी तरतूद हवी असेल, तर खर्चाचा फेरआढावा घेऊन तसा सुधारित प्रस्ताव सादर करा, अशी सूचना केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी महापालिकेला केली होती. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गाची लांबी १६.५९ किलोमीटर असून वनाझ ते रामवाडी हा मार्ग १५ किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही मार्गासाठीचा मूळ खर्च आठ हजार ४०१ कोटी रुपये अपेक्षित होता. प्रकल्पाचा कालावधी सन २००९ ते २०१४ असा गृहित धरून हा खर्च निश्चित करण्यात आला होता.
प्रकल्पाचा कालावधी आता सन २०१४ ते २०१९ असा धरण्यात आला असून बाजारभावाप्रमाणे प्रकल्प खर्चाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका आणि दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांची चर्चाही झाली आहे. दोन्ही मार्गाचा मिळून हा खर्च आता दहा हजार कोटींवर गेला आहे.
मेट्रो प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करताना लोखंड, सिमेंट तसेच जागांचे वाढते दर यांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. तसेच नेहरू योजनेतील प्रकल्प राबवताना प्रकल्पखर्च कशा पद्धतीने वाढत गेला, याचाही विचार करण्यात आला आहे. खर्चाचा हा फेरआढावा आता महापालिकेची मंजुरी घेऊन राज्य शासनाला सादर केला जाईल. राज्य मंत्रिमंडळाने या वाढीव खर्चाला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्यामार्फत केंद्राकडे जाईल व त्यानंतर त्याला केंद्राची मंजुरी मिळेल. ही प्रक्रिया वेगाने पार पडली, तर राज्य व केंद्राच्या आगामी अंदाजपत्रकात मेट्रोसाठी तरतूद होऊ शकते.

Story img Loader