मूकबधिर असल्याचा व मूकबधिर, अनाथांच्या संस्थेसाठी मदत मागण्याचा बहाणा करून चो-या करणारी, विशेषत: लॅपटॉप, किमती मोबाइल चोरणारी केरळ, तामिळनाड राज्यातील टोळी शहरात कार्यरत असून त्यातील दोघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. या दोघा मूकबधिर तरुणांना पोलिसांनी ‘बोलते’ केल्यावर त्यांच्या कारवायांवर प्रकाश पडला. दोघांना बोलते करण्यासाठी पोलिसांना भाषांतर करणा-यांची मदत घ्यावी लागली.
शहरात विशेषत: सावेडी उपनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरांतून लॅपटॉप, आयफोन, किमती मोबाइल फोन चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामागे लहान मुलांची टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले होते. अशाप्रकराच्या चो-यांमध्ये पुन्हा गेल्या आठवडय़ापासून अचानक वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळा, शीलाविहार, सिव्हिल हडको, वैदूवाडी या भागातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ७ लॅपटॉप, आयफोन, किमती मोबाइल चोरीला गेले. प्रशांत अरुण पगारे, तृप्ती किरण अहलुवालिया, अशोक देवराम जावळे, हर्षल सुनील वसावे आदींनी यासंदर्भात तक्रारी दिल्या आहेत. सावेडी उपनगरात विद्यार्थी, नोकरदार इमारतीमधून खोल्या भाडय़ाने घेऊन राहतात. मदत मागण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात जायचे, लक्ष नसले की किमती वस्तू उचलायची, लक्ष गेले तर मदत मागणारा कागद पुढे करायचा असे प्रकार घडत.
भरदिवसा घरातून लॅपटॉप, मोबाइल चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे यांनी दिवसा गस्त सुरू करण्याची सूचना तोफखाना पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार, सहायक निरीक्षक राहुलकुमार पाटील यांना केली. त्यानुसार काल सकाळी गस्त घालताना पाइपलाइन रस्त्यावरील श्रीराम चौकात दोन संशयित तरुण सहायक निरीक्षक पाटील हवालदार शेरकर, पंधरकर, दत्तात्रेय इंगळे, संदीप पवार, एकनाथ मित्ते यांच्या पथकास आढळले. त्यांची झडती घेतली असता, दोघे मूकबधिर असून, केरळच्या केन्नानुर जिल्हय़ातील ‘ऑर्फन चॅरिटी हायस्कूल वुमेन वेल्फेअर’ या संस्थेसाठी मदत करण्याचे आवाहन करणारी इंग्रजी भाषेतील पत्रके त्यांच्याकडे आढळली. त्याचबरोबर ४० हजार रु.चा आयफोन व २० हजार रु.चा सोनी इरिक्सनचा मोबाइलही होता. मदत मागणा-यांकडे इतके किमती मोबाइल कसे या संशयावरून पाटील यांनी दोघांना ताब्यात घेतले, मात्र दोघे मूकबधिर असल्याचाच बहाणा करत होते, अखेर त्यांना बोलते केल्यावर त्यांनी कशाप्रकारे चो-या केल्या याची माहिती पोलिसांना दिली.
शक्ती गोविंदन (२१) व सुरेश कुप्पन (१९, रा. वेल्लोर, तामिळनाडू) अशी दोघांची नावे आहेत. दोघांना मंगळवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दोघांना तामिळशिवाय दुसरी भाषा येत नाही, त्यामुळे विचारपूस करण्यासाठी पोलिसांना तामिळ भाषेची माहिती असणा-याची मदत घ्यावी लागली. या दोघांशिवाय इतरही काही जण असाच चोरीचा उद्योग करत असल्याचा व त्यांचा सूत्रधारही नगरमध्येच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशाप्रकारे मदत मागणारे आढळल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.