विदर्भाच्या साहित्य क्षेत्रात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचा रविवारी, २० जानेवारीला ९० वा वर्धापनदिन साजरा होत आहे. वि.सा. संघाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ संघटक मनोहर म्हैसाळकरांकडे आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने आजवरच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीविषयी त्यांनी ‘लोकसत्ता’ कडे व्यक्त केलेले मनोगत..
गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाची वास्तू आणि आर्थिक तसेच साहित्यिक व्यवहारांशी संबंध असलेले कुशल संघटक मनोहर म्हैसाळकर एक मुरब्बी राजकारणीही आहेत. संस्था व्यवहाराच्या समर्थनार्थ किंवा विरोधातील भूमिका, विचारसरणी किंवा सहेतूक अलिप्तपण इत्यादी राजकीय संकेत म्हैसाळकर त्या त्या वेळी पाळतात. त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर असण्याची अजिबात गरज नाही. तब्बल ९०वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेची वास्तू किंवा संस्थेच्या व्यवहाराने अनेक वाद त्यांच्या अवतीभवती निर्माण झाले आहेत. काही प्रश्नांची सोडवणूक त्यांच्यापरीने त्यांनी केली मात्र, अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. केवळ वर्तमानपत्रांच्या मथळ्यातच नव्हे तर अनेक टोकदार टीका संस्थेच्या आजीमाजी सदस्यांनी यापूर्वी त्यांच्यावर केल्या आहेत. असे अनेक आघात, आरोप-प्रत्यारोप झेलून, पचवून किंवा दुर्लक्ष करून संस्थेला वाढवत नेण्याची किमया अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या संघटन कौशल्यामुळे, राजकीय भानामुळे शक्य झाली आहे. भलेही म्हैसाळकरांना स्वत:ला राजकारणी म्हणवणे आवडत नाही मात्र, राजकारण वाईट आहे, असेही ते मानत नाहीत. संस्थेत कोणाला ठेवायचे, कोणाला किती वाढू द्यायचे, कोणाला कुठे ब्रेक लावायचा किंवा कोणाला किती मोकळे वातावरण द्यायचे, हे मनोहर म्हैसाळकरच ठरवतात.
विदर्भ साहित्य संघाच्या रविवारी होणाऱ्या ९० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने मनोहर म्हैसाळकरांशी खास बातचीत केली. या निमित्ताने म्हैसाळकरांनी अतिशय प्रगल्भपणे अनुभवांची शिदोरी खुली केली. म्हैसाळकर म्हणाले, संस्थात्मक विरोध असेल तर विरोध करतो मात्र, व्यक्तिगत विरोध असेल तर उत्तर देणे टाळतो. जे कोणी संस्थात्मक बांधणीच्या हेतूने संस्थेत प्रवेश करतात ते टिकतात. मात्र, ज्यांचा संस्थेत व्यक्तिगत स्वारस्य किंवा पदाची लालसा वाढते, जे इतर संस्था स्थापन करून विदर्भ साहित्य संघापुढे आव्हान निर्माण करतात, संस्थेच्या कामात अडसर ठरायला लागतात. त्यांचा विरोध मोडून काढण्यात मला आनंद मिळतो’.
यावरून म्हैसाळकर कसलेले राजकारणी नाहीत, असे कोण म्हणेल? जे काम हातात घेतले त्यावर नजर खिळवून मार्गात आलेल्या दगड-धोंडय़ांची पर्वा न करता ते निर्धोकपणे करीत राहणे, ही त्यांची आजवरची ख्याती आहे. काही काळ शिक्षकी पेशात वावरलेले, त्यानंतर विदर्भ साहित्य संघाच्या वास्तूत होणाऱ्या दारव्हेकरांच्या रंजन कला मंदिराशी जुळल्या गेलेल्या म्हैसाळकरांचा गेल्या चार दशकांचा या वास्तूशी ऋणानुबंध आहे. त्यांच्यातील कार्यकर्त्यांचा गुण ओळखून विदर्भ साहित्य संघातर्फे त्यांना सभासद करण्यात आले. आज दुसऱ्यांदा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद म्हैसाळकर भूषवत आहेत. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचे नवतेचे पर्व सुरू झाले आहे. मागे वळून ही वाटचाल पाहताना ते स्वत:ला फार काही वेगळे समजत नाहीत. साहित्यिक, रंगकर्मी, लेखकू इत्यादी बिरुदावली जोडायला त्यांना आवडत नाही. एका शब्दात सांगायचे तर ते स्वत: व्यवस्थापक (मुनीमजी) म्हणवतात.
संस्थेतील आत्तापर्यंतचा काळ आनंदाने उपभोगल्याचे म्हैसाळकरांनी आवर्जून सांगितले. लोकांच्या चांगल्या गुणांचा संस्थेच्या भरभराटीसाठी उपयोग करून त्यांच्या अवगुणांचा उपसर्ग संस्थेला किंवा स्वत:ला होऊ द्यायचा नाही, अशी शिस्त त्यांनी स्वत:ला लावून घेतली आहे. त्यांना संगीताची केवळ आवडच नाही, त्यातील बऱ्यावाईटाची जाणही आहे. संगीताचे त्यांच्या जीवनात अढळ स्थान असून त्यांच्या दिवंगत पत्नी माधवी म्हैसाळकर संगीताच्याच प्रांतातून त्यांच्या जीवनात आल्याचे ते सांगतात. नाटय़, संगीत, लेखन अशा विविध कलांशी चौफेर संबंधित असलेल्या आणि त्यात रमणाऱ्या म्हैसाळकरांनी कधीही कलेच्या एका प्रांतात स्वत स्वत:ला गुंतवून घेतले नाही. उलट या कलांचे जतन करणाऱ्या विविध संस्थांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले.
‘पालक म्हणून संस्थेतील विघ्न दूर करणे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी जे जे काही करावे लागेल ते मी करतो’, असे ते अभिमानाने सांगतातही. या ९०वषार्ंच्या संस्थेच्या वाटचालीत मनोहर म्हैसाळकर यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, आम्ही साहित्यिक निर्माण केले नाहीत. मुळात ते संस्थेचे कामच नाही. सुरेश भट, महेश एलकुंचवार, कवी अनिल असे असंख्य साहित्यिक आम्ही निर्माण केले नाहीत. ते स्वयंभू होते. ख्यातकीर्त लोक एकत्र आल्याने संस्था मोठी झाली. तर काही व्यक्ती संस्थेमुळे मोठय़ा झाल्या. त्यामध्ये मी आहे’.
अनेक वर्षे विदर्भ साहित्य संघ जिल्ह्य़ापर्यंत होते. नंतरच्या काळात ते तालुक्यापर्यंत पोहोचले. आज घडीला संघाच्या ५७ शाखा आहेत. सिंधी येथे नवीन शाखा तर भंडारा जिल्ह्य़ातील मोरगाव-अर्जुनी येथील शाखा त्यांनी पुनर्जीवित केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा