संकटाच्या काळात जी माणसे समाजातील विविध क्षेत्रात काम करीत असतात ती पुढे येत असतात त्यातीलच एक म्हणजे अण्णाजी मेंडजोगे आहेत, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अण्णाजींच्या कार्याचा गौरव केला. मानव मंदिरतर्फे देण्यात येणारा प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार अण्णाजी मेंडजोगे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी गडकरी बोलत होते. शाल, श्रीफळ, अकरा हजार रुपये रोख आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रिमियरचे अध्यक्ष रवींद दुरुगकर, माजी मंत्री रमेश बंग, नागपूर नागरिक बँकेचे संचालक राजेश लोया, समाजसेवक गिरीश गांधी उपस्थित होते.
शिक्षकांसाठी बँक असावी या उद्देशाने त्यांनी परिश्रम घेऊन बँकचे रोपटे लावले होते. आज बँकेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून त्यात अण्णाजींचा मोठा वाटा आहे. बँक संकटात असताना अण्णाजींनी परिश्रम घेऊन आणि लोकांचा विश्वास संपादन करून बँक चांगल्या स्थितीत आणली आहे. संकटाच्यावेळी जी माणसे काम करीत असतात ती माणसे कार्याने समोर येत असतात. अण्णाजींनी जनसंघाचे काम केले. सहकार क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पैसे घेतल्याशिवाय आज काम होत नाही, अशी अवस्था आहे. सहकार क्षेत्रातील संचालकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कायदा न तोडता समाजातील गोरगरीब लोकांना मदत करण्याची भावना सहकार क्षेत्रात राहिली नाही.
गरीब माणूस आज प्रामाणिक आहे, मात्र त्याच्यावर अन्याय केला जात आहे. अण्णाजींनी समाजातील गोरगरीब लोकांना आणि शेतकऱ्यांना मदत केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करताना त्यांनी संघाशी कटिबद्धता आणि विचारांशी बांधिलकी जपली. कधीही विचारांशी तडजोड केली नाही. शिक्षण क्षेत्रातही अण्णाजींनी मोठे काम केले, असेही गडकरी म्हणाले. रमेश बंग यांनी अण्णाजींच्या कार्याची ओळख करून त्यांचा गौरव केला.
यावेळी महापौर अनिल सोले, राजेश लोया, रवींद्र दुरुगकर यांची गौरवपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर संचालन संजय भाकरे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा