वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या चाचणीसाठी लखनौच्या ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) या भारतीय रेल्वेशी संबंधित संस्थेचे दहा जणांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मेट्रो रेल्वेला सुरक्षाप्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक चाचण्यांची पाहणी हे पथक वसरेवा ते घाटकोपर या मार्गावर आता करणार आहे. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम चाचण्यांचा मार्ग मोकळा होईल.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. मेट्रो रेल्वे सुरू होण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याआधी ‘आरडीएसओ’च्या चाचणी परीक्षेत मेट्रो रेल्वेला यशस्वी व्हावे लागणार आहे. मेट्रो रेल्वे आपल्या रुळांवरून व्यवस्थित धावते की नाही, तिचा प्रवास सुरक्षित आहे की नाही, विविध परिस्थितीत मेट्रो रेल्वेसाठी आणलेल्या गाडय़ा योग्यरित्या चालतात-थांबतात की नाही अशा चाचण्या या पथकाच्या देखरेखीखाली पार पडतील. त्यात यशस्वी झाल्यास हे पथक मेट्रोच्या अंतिम चाचण्यांना हिरवा कंदील दाखवणारा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांना देतील. त्यानंतर मेट्रोच्या सुरक्षा चाचणीचा अंतिम टप्पा सुरू होईल.

    

Story img Loader