भविष्यात कांद्याची निर्यात २० लाख मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे यापुढे निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांचे अनुभव, कष्ट आणि नवे तंत्रज्ञान यातून कांद्याचे उत्पादन वाढणार आहे, असा सूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कांदा पीक परिसंवादातून व्यक्त झाला.
बाजार समितीचे सभापती प्रकाश घुगे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य शासनाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘आत्मा’चे नाशिक विभागीय प्रकल्प संचालक सुभाष नागरे, निवृत्त अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे, धुळ्याच्या कृषी महाविद्यालयातील कांदातज्ज्ञ डॉ. श्रीधर देसले, तालुका कृषी अधिकारी राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर कांदा पिकाखालील क्षेत्र आहे. परंतु कांद्याचे घटते उत्पादन, कांदा पिकावरील विविध रोग आणि कीड व्यवस्थापन, उच्च उत्पादन व साठवणूक तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा परिसंवाद झाला. डॉ. भोंडे यांनी भविष्यात मोठय़ा प्रमाणावर कांदा निर्यात होणार असल्याने कांद्याची मागणी वाढू शकेल असे नमूद केले. सध्या कांदा निर्यातीसाठी २० लाख मेट्रिक टन उद्दिष्ट होते. त्यापैकी ११.६३ लाख टन कांदा उत्पादन झाले. उत्पादन कमी झाल्यामुळे तुटवडा होऊन कांद्याचे भाव वाढले. त्यामुळे कांद्याची उत्पादन वाढ करून साठवणूक कशी करावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कांद्याचे उत्पादन आता परवडत नाही, अशी ओरड होते. परंतु त्यासाठी कांदा उत्पादकता वाढवली पाहिजे, कांद्यासाठी तण नसलेले शेत, ठिबक सिंचनाचा वापर आणि प्रगत तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, तरच उत्पादन वाढेल, असे ते म्हणाले.
कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्रीधर देसले यांनी कांदा रोगावरील कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करताना कांद्यासाठी खताचे व्यवस्थापन, लागवडीनंतर तण नाशकाचा वापर आणि जैविक कीड नाशकाचा वापर ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करावा, खताचे प्रमाण संतुलित असावे, लागवडीआधी माती परीक्षण करावे यावर त्यांनी भर दिला. एकरी २०० क्विंटल कांद्याचे उत्पादन निघणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसंवादात स्लाइड शोद्वारे आदर्श कांदा, कांदा उत्पादन तंत्रज्ञान, कांदा तयार झाल्याची लक्षणे, निवड व प्रतवारी, ऊन व पावसापासून संरक्षण यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. कांदा उत्पादनासंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
कांदा अभ्यासकांनी योग्य मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. कांदा उत्पादन वाढीसाठी परिसंवाद मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा सभापती प्रकाश घुगे यांनी व्यक्त केली. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा