नगरसह राज्यातील चार, पाच जिल्ह्य़ात लूट करून धुमाकूळ घातलेल्या टोळीला श्रीगोंदे पोलिसांनी जेरबंद केले. मात्र या टोळीतील काही साथीदार फरार आहेत.
या टोळीने आत्तापर्यंत राज्यातील विविध ठिकाणच्या आठ बँकांमधून ४६ लाखांची लूट केली आहे. जिल्हा पोलीस उपधीक्षक धिरज पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, महेश जाधव (जामखेड), अविनाश काळे (चौंडी, तालुका जामखेड) व सुरेश उकम या तिघांसह अन्य साथिदारांच्या या टोळीने पुणे, सातारा, सोलापूर, उसमानाबाद, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये धुमाकूळ घातला होता.  महेश जाधव व अविनाश काळे यांनी श्रीगोंदे पोलिसांकडे या दरोडय़ांची कबुलीही दिली आहे. या टोळीचे आणखी कोणाशी लागेबांधे आहेत याची चौकशी पोलीस करीत आहेत.
नगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अजनूज (तालुका श्रीगोंदे) शाखेत दि. २४ नाव्हेंबरला दरोडय़ाचा प्रयत्न झाला होता. बँकेचा सुरक्षारक्षक चांगदेव सपकाळ याच्या सतर्कता व गांवकऱ्यांमुळे हा दरोडा अयशस्वी ठरला. त्या वेळी महेश जाधव व अविनाश काळे या दोघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौकशीत या दोघांनी बँक लुटीची सर्व माहिती देऊन या गुन्ह्य़ांची कबुलीही दिली. या टोळीने आत्तापर्यंत जिल्ह्य़ात पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर, माणिकदौन्डी, कर्जत तालुक्यातील खेड, श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळाजापूर, येळापूर, लातूर, सातारा जिल्ह्य़ातील काही बँका लुटल्या आहेत.

Story img Loader