देशातील चार राज्यांच्या निवडणुकांच्या आज जाहीर झालेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी अधिक जागरूक, सावध व एकदिलाने, परंतु ठोसपणे प्रचार करावा, अशी सूचना आघाडीच्या नेत्यांनी केली. मात्र स्थानिक शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांच्या आपसात निर्माण झालेल्या बेदिलीचा योग्य तो संदेश मतदारांपर्यंत पोहोचला असल्याचाही आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे.
चार राज्यांतील निकालाचा नगर महापालिका निवडणुकीत परिणाम जाणवेल का, याविषयी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या आज झालेल्या पहिल्याच संयुक्त बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी ऊहापोह केला. राष्ट्रवादी भवनमध्ये ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे प्रभारी आ. शरद रणपिसे, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, आ. अरुण जागताप, माजी आमदार दादा कळमकर, काँग्रेसच्या प्रदेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा व संग्राम जगताप आदी या वेळी उपस्थित होते.
चार राज्यांतील निकालांचे काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अधिक सावध व अधिक ठोसपणे, आघाडीचाच महापौर, उपमहापौर होणार हे ठसवणारा प्रचार करावा, आघाडीच्या उमेदवारांनी आपसात मेळ ठेवावा, अशी सूचना आ. पाचपुते यांनी केली. शहर विकासासाठी आपण पालकमंत्री म्हणून अनेक योजना आणल्या, मात्र युतीने त्यात आडकाठी आणली, याकडे मतदारांचे लक्ष वेधावे. आ. जगताप यांनी सर्व प्रभागांत प्रचाराला जावे आदी सूचनाही पाचपुते यांनी केल्या. युतीच्या नेत्यांनी कितीही सारवासारव केली तरीही ‘हौद से गयी वो बुँदसे नही आती’ अशी स्थिती आहे. त्यांच्यातील आपसातील बेदिलीचा योग्य तो संदेश मतदारांपर्यंत गेला आहे, याकडे लक्ष वेधताना काकडे यांनी पुण्यातील मतदारांच्या याद्या आपल्याकडे द्याव्यात, त्यांना नगरला आणण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. आ. रणपिसे यांनी मात्र चार राज्यांच्या निकालाचा परिणाम होणार नाही, असा दावा केला. मनपाची निवडणूक स्थानिक प्रश्नांशी निगडित आहे, ज्याचा जनसंपर्क अधिक त्याला जनमताचा कौल मिळेल, असे ते म्हणाले. युतीचे नेते आपसातील वाद मिटवू शकत नाहीत ते शहराचे प्रश्न काय सोडवणार, अशी टीकाही रणपिसे यांनी केली.

Story img Loader