एक कलाकार म्हणून आपल्या कलेशी प्रामाणिक राहा, त्या कलेशी प्रतारणा करू नका आणि आपल्यातील कलाकाराचा सातत्याने शोध घेत अभिव्यक्त व्हा, असा सूर गुरुवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय महारंग परिषदेत ‘ द आदर आर्ट्स- अ‍ॅण्ड क्वेश्चन अबाऊट देअर्स फ्युचर्स’ या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सतर्फे विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या चर्चेत तालवादक तौफिक कुरेशी, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुधीर मिश्रा, हिंदी साहित्यिक उदय प्रकाश आणि चित्रकार प्रभाकर कोलते हे मान्यवर सहभागी झाले होते. निखिलेश चित्रे यांनी सूत्रसंचालन केले.
कोलते यांनी सांगितले, आजकाल ‘ग्लोबल’ होणे खूप सोपे झाले आहे. पैसे मोजले की कोणालाही ग्लोबल होता येते. १९५० ते ७० च्या दशकापर्यंत चित्रकला ही आवड होती मग तो व्यवसाय झाला आणि आता ते करिअर झाले आहे. या क्षेत्रात रसिकांची जागा आता गुंतवणूकदारांनी घेतली आहे. उदय प्रकाश म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत भाषा आणि लेखकाला फारसे महत्त्व उरलेले नाही. लेखक हा फक्त त्याच्या वाचकापुरता राहिला आहे. सुधीर मिश्रा यांनी भविष्यात भारतीय चित्रपट जगाच्या पातळीवर जात असताना त्याने आपली परंपरा, विचारधारा, संस्कृतीचे विस्मरण होऊ देऊ नये. चित्रपटात आपल्या समाजमनाचे प्रतिबिंब उमटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तौफिक कुरेशी म्हणाले, पं. रविशंकर, उस्ताद अल्लारखॉं यांनी परदेशात केलेल्या मैफलीतून पाश्चिमात्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील राग आणि ताल यांची ओळख करून दिली.
त्यानंतर यात पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद बिस्मिल्ला खान, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शिवकुमार शर्मा, आणि अन्य कलाकारांनी परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय केले. तर अलीकडे आर. ए. रहेमान यांनी हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आपले संगीत तिकडे पोहोचविले, असे मत व्यक्त केले.

Story img Loader