पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कोल्हापूर महानगरपालिका कितपत जबाबदार आहे हे सत्य आता सामोरे आले असून लोकांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकांच्या विरोधात शासनाने ठोस कारवाईची पाऊले उचलावीत, अशी मागणी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने व प्रदूषण नियंत्रण मंडळांचे प्रादेशिक अधिकारी सु. सं डोके यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्हाधिकारी माने यांनी कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाटबंधारे अधिकारी तसेच प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांचे सोबत या प्रश्नावर पुन्हा एकदा व्यापक बैठक बोलाविण्याचे या वेळी ठरले.
जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत पंचगंगेच्या प्रदूषणाबाबत चर्चा झाली. पंचगंगा नदीत टँकरने कोल्हापूर महानगरपालिकेचा मैला सोडण्यात येत असलेल्या वृत्ताकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रदूषणामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगून काविळ, गॅस्ट्रो यासारखे भयंकर रोग थैमान घालत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
सहा महिन्यापूर्वी इचलकंरजी शहरात काविळीने ४० जणांचा बळी घेतला असून आजही शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून काविळीचे रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्यात हा प्रश्न गंभीर बनणार असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर फ़ौजदारी गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली. शासनाने याप्रश्नी कठोर पावले उचलावीत आणि पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी. त्याचबरोबर नदीच्या शुध्दीकरणाची व्यापक मोहीम हाती घ्यावी असे आवाडे म्हणाले.
इचलकरंजी येथे राबविण्यात आलेल्या सी. ई. टी. पी. प्लंॅटप्रमाणे जिल्हयामध्ये ज्या ठिकाणी जल प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी असे प्लंॅट शासनाच्यावतीने उभे करुन जल प्रदूषण मुक्तीचे काम हाती घ्यावे व त्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इचलकरंजी शहर काँग्रसेचे अध्यक्ष अशोक आरगे, जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे, दादासो सांगावे यांनीही या प्रश्नी समस्या मांडल्या.
या शिष्टमंडळात नगरपालिकेचे आरोग्य सभापती जहांॅगिर पट्टेकरी, जवाहर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विलास गाताडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह २०० कार्यकर्त्यांचा समोवश होता. या वेळी हातकणंगले सभापती शुभांगी पाटील, सदस्य रंगराव खांडेकर, शिवाजी पुजारी, सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
पंचगंगेच्या प्रदूषणावर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय
पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कोल्हापूर महानगरपालिका कितपत जबाबदार आहे हे सत्य आता सामोरे आले असून लोकांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकांच्या विरोधात शासनाने ठोस कारवाईची पाऊले उचलावीत, अशी मागणी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने व प्रदूषण नियंत्रण मंडळांचे प्रादेशिक अधिकारी सु. सं डोके यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत केली आहे.
First published on: 14-12-2012 at 09:29 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extensive meeting on panchganga pollution