स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांबाबत शंका आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र मागावे किंवा मनपाच्या एलबीटी कार्यालयाशी संपर्क (मोबाईल-९५६११११९६७ ) साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, बुधवारच्या प्रकरणात सोने व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्यांमध्ये मनपाचाच एक वरिष्ठ कर्मचारी असल्याची माहिती मिळाली.
पोलीस तपासात अद्याप या व पळून गेलेल्या अन्य दोन कर्मचाऱ्यांचे नाव निष्पन्न झालेले नाही. अटक करण्यात आलेल्या लाडाशेठ ऊर्फ जमनादास होतचंद भाटिया याचे शहरातील एका वरिष्ठ राजकारण्याशी जवळचे संबंध आहेत. त्याच्याकडे पोलीस मनपा कर्मचाऱ्यांच्या नावाबाबत चौकशी करत आहेत. सोन्याचे दागिने घेऊन नगरमध्ये आलेल्या एकाला स्थानिक संस्था कर विभागाचे कर्मचारी आहोत असे भासवून लाडाशेट व अन्य तिघांनी त्याच्याकडे खंडणी मागितली. स्वप्नील धनाजी जाधव या त्या व्यापाऱ्यानेच यासंबंधी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर लाडाशेठला अटक करण्यात आली.
याच प्रकरणावरून मनपाच्या वतीने आज निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.  मनपाच्या कर्मचाऱ्यांना मार्गस्थ वाहनातील मालाची तपासणी करण्याचे अधिकार आहेत, मात्र याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी मनपाचा कर्मचारी आहे किंवा नाही असा संशय आल्यास थेट मनपा कार्यालयाशी वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत व्यापारी २३४३००७ या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.