शहरातील रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त पादचारी पुलाचे काम एप्रिलमध्ये सुरू होईल, तसेच रेल्वेची पाणीटंचाई दूर करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महादेव बंधाऱ्याचे गाळ काढण्याचे काम वरिष्ठांच्या मंजुरीनंतर सुरू केले जाईल, अशी माहिती भुसावळ विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक प्रदीप बारापात्रे यांनी येथे दिली.
रेल्वे स्थानकातील टंचाई, स्थानकातील विविध समस्या व विकास कामे या एकूणच पाश्र्वभूमीवर बारापात्रे यांनी स्थानकाला भेट दिली. स्थानकातील फलाट, कार्यालये, विश्रामगृह अशा विविध भागांना भेट देऊन दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. स्थानकात भीषण टंचाई जाणवत असल्याने येथे केवळ मेल, एक्स्प्रेस गाडय़ा आल्यावरच फलाटावरील नळ सुरू केले जातात. इतर वेळी ते बंद केले जातात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
प्रशासन प्रवाशांमध्ये भेदभाव करत असून शटल पॅसेंजरच्या प्रवाशांनाही पाणी मिळावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे प्रशासन उपलब्धतेनुसार पाण्याचे वितरण करते. रेल्वेला स्थानकासह रेल्वे वसाहत, रेल्वेचे विविध विभाग, शिवाय रेल्वेची धुण्याची जागा या भागाला पाणीपुरवठा करावा लागतो.
आवर्तनानुसार मिळालेल्या पाणी साठय़ासह काही जुन्या विहिरींचे पाणी उपयोगात आणले जात आहे. रेल्वे स्थानकात उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती बारापात्रे यांनी दिली.
रेल्वेच्या महादेव बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रस्ताव महाप्रबंधकांना सादर करण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल. तसेच मनमाड स्थानकात अतिरिक्त पादचारी पूल बांधण्याचे काम रखडलेले आहे. या कामाला निधी उपलब्धही झाला आहे. त्यामुळे एप्रिलपासून पादचारी पूल बांधण्याच्या कामास गती दिली जाईल, अशी ग्वाही बारापात्रे यांनी दिली.
रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी बारापात्रे यांना पादचारी पूल, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम, स्थानकातील टंचाई या कामांची माहिती दिली.
स्टेशन अधीक्षक व्ही. डी. राठोड, मंडल वाणिज्य अधिकारी एन. जी. बोरीकर आदींसह रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा