रेल्वेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प कागदावरच
अंबरनाथ येथे रेल्वेचा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. बिसलेरी, अॅक्वा आदी कंपन्यांप्रमाणे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांद्वारे पिण्याचे पाणी सर्व रेल्वे स्थानकांवर पुरविण्यात येणार होते. हा प्रकल्प रेल्वे बोर्डाने उभारायचा असून अद्याप या प्रकल्पाबाबत नेमके काय झाले आहे, याबाबत काहीही माहिती कोणालाही नाही. जमीन अधिग्रहीत करण्यापासूनच सर्व तयारी अजून व्हावयाची आहे.
मागील वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात उपनगरी गाडय़ांच्या संख्येत भर घालून ७५ नवीन फेऱ्या सुरू करण्याची घोषणा झाली होती. यामध्ये चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसटी-कसारा, सीएसटी-कर्जत, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर नवीन जादा फेऱ्यांबरोबरच काही गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढविण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. या घोषणेतील विरार-डहाणू या गाडीबाबत अद्यापही साशंकता व्यक्त होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील सर्व गाडय़ांच्या डब्यांची संख्या ९ वरून १२ करण्यात आली असून १५ डब्यांच्या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेवर २३ जादा फेऱ्या वाढविण्यात आल्या असून १५ डब्यांची गाडी सुरू करण्यात आली आहे. या १५ डब्यांच्या गाडीच्या आठ फेऱ्या असून लवकरच त्या वाढविण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर मात्र अद्याप नऊ डब्यांचीच गाडी सुरू असून मार्च अखेपर्यंत १० डब्यांची गाडी सुरू करण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर अलीकडेच सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात आल्या असून तेथील प्रवासी क्षमात ३३ टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येते. मध्य रेल्वेवरील दैनंदिन प्रवाशांची संख्या ४० लाखांच्यावर पोहोचली असून पश्चिम रेल्वेवरही ही संख्या ३६ लाख झाली आहे.
विरार ते डहाणूदरम्यान उपनगरी गाडय़ा सुरू करण्याबाबत सतत वेगवेगळी कारणे पुढे करण्यात येत आहेत. सध्या गाडय़ांची संख्या कमी असल्यामुळे आणि येणाऱ्या नव्या गाडय़ा बोरिवली ते विरार दरम्यान जादा फेऱ्या वाढविण्यासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यामुळे विरार ते डहाणू रोड उपनगरी सेवा सुरू करण्याची शक्यता मागे पडली आहे. पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या गाडय़ा मिळाल्यावर बोरिवली-विरारसाठी आवश्यक त्या फेऱ्या वाढविल्यावर चर्चगेट-डहाणू रोड किंवा विरार-डहाणू रोड अशा किमान दोन फेऱ्या सुरू करण्यात येतील.