कळमनुरी तालुक्यातील रुपूर गावात जन्मलेले फकीर मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याची वार्ता पसरली आणि मराठवाडय़ातील साहित्य वर्तुळाला अक्षरश: आनंदाचे भरते आले. अध्यक्षपदाचा मान लागोपाठ दोन वेळा मराठवाडय़ाला मिळाल्याने साहित्य व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी फ. मुं.चे अभिनंदन केले. गेल्या जानेवारीत चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाली होती. आता फ. मुं. ची निवड झाल्याने या क्षेत्रातील मराठवाडय़ाचा अनुशेष दमदारपणे भरून निघण्यास सुरुवात झाली आहे, अशीच सार्वत्रिक भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ : लागोपाठ दुसऱ्यांदा मराठवाडय़ाला साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळाले, ही आनंदाची बाब आहे. फ. मुं. दीर्घकाळापासून काव्यलेखन करीत आहेत. तरल भाववृत्तीचा आविष्कार ते सामाजिक बांधिलकीवरील निष्ठेतून जन्मणाऱ्या स्फोटक कवितेपर्यंत त्यांनी विविध प्रकारचे काव्यलेखन केले. कवितेच्या प्रकृतीला न मानवणारा विनोद त्यांनी काव्यरूप बनविला. अशा विविध प्रकारच्या काव्याचे लेखन करणाऱ्या या कवीचा हा उचित सन्मान आहे. अध्यक्षपदी निवडून येण्यास मराठवाडय़ातील मतदारांनीही फ. मुं. ना मोठी साथ दिली.
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील : हा अपेक्षित निकाल होता. मराठवाडा कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे लेखक निवडणुकीला उभे राहात नव्हते. गेल्या वर्षीपर्यंत हाच अनुभव होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उभे राहिले आणि निवडून आले. फ. मुं. शिंदे निवडणुकीला उभे राहिल्यानंतर ते निवडून येतील, असा अंदाज होता. चुरशीच्या या निवडणुकीत ते निवडून आल्याचा निश्चितपणे आनंद आहे. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांचे अभिनंदन.
डॉ. छाया महाजन : कुठलीही साहित्य संस्था पाठिशी नसताना फ. मुं. नी हे यश प्राप्त केले आहे. साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळणे हा त्यांचा व मराठवाडय़ाचाही सन्मान आहे. एकाच वेळी वात्रटिकाकार व ‘आई’सारख्या गंभीर कविता करणारे संवेदनशील कवी म्हणून त्यांनी आपले वेगळेपण जपले. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या व सर्वपरिचित, चांगले वक्ते असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा हा यथोचित सन्मान आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण : कळमनुरी माझे आजोळ आणि फ. मुं. याच तालुक्यातील. या नात्याने विशेष आनंद झाला. मराठवाडय़ाचा लौकिक वाढवण्यात फ. मुं. चे लक्षणीय योगदान आहे. या शिदोरीवरच त्यांना सन्मान्य पद मिळाले.
ज्येष्ठ साहित्यिक तु. शं. कुलकर्णी : कळमनुरी तालुक्याचे डॉ. ना. गो. नांदापूरकर ते नव्या पिढीतील महेश मोरे अशी या तालुक्यातील साहित्य परंपरा. या परंपरेतील मधल्या पिढीतील संपन्न प्रतिनिधी मानले जाणारे फ. मुं. हे सर्वाचे लाडके कवी. त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणे अभिमानास्पद होय. फ. मुं.ची कविता आणि समीक्षात्मक लेखन महाराष्ट्राच्या पसंतीस उतरले असून वृत्तीने नम्र असलेला हा कवी आपल्या मतांविषयी ठाम आणि आग्रही आहे.
प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख : फ. मुं. म्हटले की, मैफलीचा प्राण. फ. मुं. म्हटले की प्रसन्नता, या त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातील बाजू सांस्कृतिकदृष्टय़ा जेवढय़ा महत्त्वाच्या तेवढीच मानवतेला वंदन करणारी त्यांची कविताही महत्त्वाची आहे. २७ कवितासंग्रहांवर नाव कोरणाऱ्या या सदाबहार कवीची संमेलनाध्यक्षपदी निवड होणे ही आनंददायी बाब आहे. (फ. मुं.च्या कविता व साहित्यावर डॉ. केशव देशमुख यांनी सर्वप्रथम पीएच. डी. प्राप्त केली).
डॉ. हनुमंत भोपळे : फ. मुं.नी आजवर वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. आता अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, ही बाब अभिमानास्पद आहे.
प्रा. विलास वैद्य : कळमनुरी तालुक्यातील रुपूरसारख्या गावातून पुढे आलेल्या फ. मुं. ना साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळणे हा हिंगोली जिल्ह्य़ाचाही बहुमान आहे. मराठी कवितेला उंचीवर नेऊन ठेवणारा बहुआयामी कवी अध्यक्ष होणे हिंगोलीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. कोणत्याही वादाशिवाय फ. मु. अध्यक्ष झाले, हीदेखील मराठवाडय़ासाठी समाधानाची बाब आहे. ज्येष्ठ साहित्यिक भ. मा. परसावळे : अजातशत्रू फ. मु. संमेलनाध्यक्ष झाले, ही मराठवाडय़ासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
मूळ परभणीच्या भूमिपुत्राचा बहुमान
परभणी : फ. मुं. िशदे एका अर्थाने जुन्या परभणी जिल्ह्याचेच भूमिपुत्र. जिल्हा विभाजनापूर्वी कळमनुरी तालुका पूर्वी परभणी जिल्ह्यातच होता. िहगोली जिल्हा निर्मितीनंतर कळमनुरी िहगोलीत समाविष्ट झाला. मात्र, फ.मुं.ची परभणीशी नाळ कायम राहिली. परभणीच्याच शिवाजी महाविद्यालयात फ. मुं.चे महाविद्यालयीन शिक्षण झाले. खासदार गणेश दुधगावकर, प्रा. सुरेश जाधव, गणेश घांडगे, प्रा. शफी हे फ. मुं. चे जवळचे मित्र. महाविद्यालयीन काळात हा सर्व गट सांस्कृतिक उपक्रमांत आघाडीवर असे. परभणीला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन झाले, त्याचे उद्घाटन फ. मुं.च्या हस्ते पार पडले होते. फ. मुं.च्या निवडीबद्दल परभणीत आनंदाची भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव म्हणाले, ‘फ.मुं.नी ‘आई’वर नितांत सुंदर कविता लिहिली. एका मातृहृदयी
कवीचा हा गौरव आहे. सलग दोन वेळा मराठवाडय़ाला हा बहुमान मिळाला. बी. रघुनाथ यांच्यानंतर परभणीच्या भूमीतील महत्त्वाचे कवी म्हणून फ. मुं.चाही उल्लेख केला पाहिजे. परभणीच्या साहित्य वर्तुळात फ. मुं.च्या निवडीबद्दल आनंद व्यक्त होत आहे.
फ. मुं. अंतरंगी गंभीर!
प्रतिनिधी, औरंगाबाद
मेघ असो, मेघ नसो
मोर नाचतोच आहे
पिसाऱ्यातल्या पिसांचा
ढीग साचतोच आहे
अश्रू न्याहाळतो कोण
डोळे झरता झरता
मोर जगास दिसतो
फक्त पिसाऱ्यापुरता
‘फ. मुं.’ च व्यक्तिमत्त्व या कवितेसारखंच. जगाला दिसणारा त्यांचा विनोद, त्यांच्यातला मिश्कीलपणा, त्यांच्या कवितांमध्ये असणारा उपहास एका बाजूला आणि फ. मुं.चं व्यक्तिमत्त्व वेगळंच. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मुं.ची निवड झाली. त्यानंतर बोलताना त्यांच्या पत्नी लीला शिंदे म्हणाल्या, ‘‘हे व्यक्तिमत्त्व तसे गंभीर. समूहात रमणारे. बाहेर जरी बहुतेकांना फ. मुं. विनोदी कवी वाटत असले तरी त्यांची तशी प्रकृती नाही. घरात ते गंभीर असतात. लिहिताना भोवताली कितीही गोंगाट असला, तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. तशी लिहिण्याची जागा अशी नाहीच. लिहिताना ते आपल्याच धुंदीत असतात. मित्रमंडळी आली की, बैठक जमते. तेव्हा हा माणूस खुलतो.’’ आम्हीदेखील त्या समूहाचा भाग म्हणूनच त्यांच्याबरोबर राहतो. त्यामुळे घरात पारंपरिक नातेसंबंधाचे जे वातावरण असते, तसे आमच्याकडे नाही, असं लीला शिंदे सांगत होत्या.
साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. मराठवाडय़ाला सलग दुसऱ्यांदा हे मानाचं पान मिळालं. तेव्हा मलाही बरंच वाटलं, असं सांगणाऱ्या लीलाबाईंचा आनंद शब्दांतून व्यक्त होत होता. त्या म्हणाल्या की, इतरांना जशी फ. मुं.ची ‘आई’ ही कविता आवडते, तशीच ती मलाही आवडते. हा माणूस मातृभक्त. त्यांची आई आजारी पडली होती, तेव्हा फ. मुं.नी त्यांची खूप सेवा केली. या व्यक्तिमत्त्वाचे भाषावैभव चकित करून जाते. ते खूप गरिबीत शिकले. त्यांना जे गुरू लाभले, त्यांच्यामुळे त्यांना भाषावैभव प्राप्त झाले, पण ते शिकण्याची वृत्ती निश्चित होती.
लीला शिंदे लहान मुलांसाठी लिहितात. पण एकमेकांच्या साहित्यावर तसा प्रभाव नाही. मी लिहिलेलं त्यांना दाखवत नाही, त्यांना ते आवडणारही नाही. प्रत्येकाने स्वत:चं लिहीत राहावं. प्रत्येकाचा लिहिण्याचा पोत निराळा असतो. पण मला एखादा पुरस्कार मिळाला की, तो फ. मुं. च्या श्रेयनामावलीत जातो. फ. मुं.ची बायको म्हणून पुरस्कार दिला असेल अशी टिप्पणी जेव्हा होते, तेव्हा थोडंसं वाईट वाटतं. त्यांच्या लिखाणाचा मात्र अभिमान आहे. पती आहे म्हणून नाही, तर बऱ्याचदा त्यांच्या कविता समजतही नाहीत. तेव्हाच चर्चा होते.
समूहात रमणारं व्यक्तिमत्त्व असल्याने ते घरी कमी वेळ असतात, अशी तक्रार लीला शिंदे जशी करतात, तशीच ती तक्रार त्यांची मुलगी ऋचादेखील करते. साहित्य संमेलन निवडणुकीच्या काळात साहित्यिकांच्या गट-तटांचे, जाती-पातींचे नाना रंग अनुभवल्याचे लीला शिंदे आवर्जून सांगतात. एवढे सगळे गट-तट बघून तसा धक्काच बसला. फ. मुं. निवडून आले याचा अर्थ त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे अनेकजण आहेत. व्याख्यानांमध्ये आणि त्यांच्या मैफलींमध्ये त्यांचे चाहते किती मन लावून त्यांची कविता ऐकतात, हे अनुभवलेलं आहे. आजच्या निवडीने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही त्या सांगतात.
फ. मुं. म्हटलं की हजरजबाबी व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येतं. पटकन आठवते ती कविता म्हणजे ‘आई.’
‘आई एक नाव असतं,
घरातल्या घरात
गजबजलेलं गाव असतं’
अशा ओळी ओठी येतात. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये फ. मुं. नूतन कॉलनी, एवढा पत्ता लिहिला की, त्यांच्यापर्यंत त्यांना पाठवलेली वस्तू मिळायची एवढे हे व्यक्तिमत्त्व परिचयाचे. नव्याने घर बदलल्यानंतरही फ. मुं.च्या व्यक्तिमत्त्वात फारसा बदल झाला नाही. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर येणाऱ्या दूरध्वनीची नोंद एका कागदावर लिहिणारी फ. मुं.ची मुलगी ऋचा तशी साहित्य विश्वापासून दूर राहणारी. तिचं क्षेत्र क्रिकेट. तिलादेखील बरेच पुरस्कार मिळाले. पण बाप-लेकींमधील बोलणं तसं पुस्तक, साहित्य यावर नाही. क्रिकेटच्या मैदानावर मुलीला सोडणे आणि तिला परत घरी आणणे हे मात्र फ. मुं.नी आवर्जून केल्याची आठवण ऋचा सांगते. तिलाही फ. मुं.ची ‘आई’ हीच कविता आवडते.
‘साहित्यातला मराठवाडय़ाचा अनुशेष भरून निघण्यास मदत’
फकीर मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याची वार्ता पसरली आणि मराठवाडय़ातील साहित्य वर्तुळाला अक्षरश: आनंदाचे भरते आले. साहित्य व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी फ. मुं.चे अभिनंदन केले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 17-10-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: F m shindes election as sahitya sammelan president appreciated