घरात शेतीभातीची समृद्ध परंपरा, या शेती परंपरेमुळेच बालपणापासून पाहिलेले-अनुभवलेले सृष्टीचे नाना विभ्रम आणि उपजत संवेदनशीलतेला सृष्टीचे कोडे उलगडण्याची लाभलेली जिज्ञासा या सर्व गोष्टींमधून कुलदीप कारेगावकर या आजच्या पिढीतल्या आघाडीच्या चित्रकाराच्या चित्रांची वाट जाते.
कुलदीप यांच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी केले. चित्रकलेतला सुरुवातीचा बराचसा काळ हा अनुकरणाचाच असतो. वेगवेगळ्या प्रभावांखाली येऊन त्या पद्धतीनेच ही निर्मिती होते. कालांतराने आपल्या अवकाशात आपलेच रंग मिसळतात आणि पुढची वाट स्वतची होऊन जाते. सध्या कुलदीप यांना चित्रकलेतील अशी स्वत:ची वाट सापडली आहे. जे तुमच्यातले मूळचे आहे, ते टिकले पाहिजे आणि तेच वाढवले पाहिजे. अन्य कुठल्या प्रणालींनी प्रभावीत होण्यापेक्षा स्वत:च्या भक्कम परंपराच्या आधारेच स्वत:ची मुळे रोवली पाहिजेत, असा कानमंत्र नेमाडे यांनी कुलदीप यांना या प्रसंगी दिला. कुलदीप यांची  सर्व चित्रे ही शेती संस्कृतीतल्या अनेक घटकांना नवनवे आयाम बहाल करणारी आहेत. मग ते पूर्णपणे उमललेले कापसाचे बोंड असो अथवा ज्वारीचे कणीस असो.
कुलदीप यांना लाभलेला कृषी परंपरेचा वारसा त्यांच्या चित्रामधून सातत्याने झिरपत जातो. त्यांच्या संवेदनशीलतेला कायमच या चित्रांनी भुरळ घातली आहे. जे त्यांनी पाहिले आहे त्यात आणखी रंग भरुन आपल्यासमोर या चित्रांचे खोलवर अर्थ ते उलगडत जातात. बदलते सृष्टिचक्र हा या कलावंताचा ध्यास आहे. निसर्ग प्रत्येक टप्प्यावर नवे रूप घेऊन येतो. कुलदीप यांची संवेदनशीलता त्यांच्या चित्रातून नवनवे आकार धारण करताना दिसते. ही चित्रे कृषी संस्कृतीच्या रंग, रूप आणि गंधांना आपल्यापर्यंत पोहचवतात. कृषी संस्कृतीच्या जगण्यातले बारकावे ते विलक्षण सौंदर्यदृष्टीने चितारतात. त्यांनी रेखाटलेले चिरेबंदी वाडय़ाचे चित्र असो अथवा शेतात पूर्णपणे उमललेले कापसाचे बोंड असो. ही चित्रे जेव्हा कुलदीप यांच्या कुंचल्यातून उतरतात तेव्हा ती दर्शकांनाही विलक्षण अनुभूती देतात. सुरुवातीला कुलदीप यांच्या चित्रांना अध्यात्माचे विलक्षण आकर्षण होते. त्यांच्या एका प्रदर्शनात पंडित जसराज आले होते. आत्मानुभूतीचा प्रत्यय देणाऱ्या एका चित्रातल्या ‘ओम’ या संकल्पनेपुढे पंडित जसराज थबकले. हे चित्र पाहून त्यांनाही काही क्षण भोवतीच्या पर्यावरणाचा विसर पडला. ‘ओम’ असा नाद त्यांच्या मुखातून काही काळ उमटत राहिला. कुलदीप यांच्या चित्रांचे गारुड हे असे कोणाच्याही मनावर प्रभाव टाकणारे आहे. चांदण्या रात्रीच्या मंद प्रकाशात पांडुरंगाच्या मंदिराकडे कटाक्ष टाकताच मनावर उमटणारे आध्यात्मिक भाव ते सामर्थ्यांने टिपतात. प्रत्येक घरासमोर असलेली तुळशी वृंदावने आणि ही वृंदावने रंगविताना ग्रामीण स्त्रियांची व्यक्त झालेली उपजत प्रतिभा कुलदीप यांच्या चित्रातून सुटत नाही. आधी या चित्रांना असलेली आध्यात्मिकतेची डूब आणि आता कृषी परंपरेतल्या मुळांचा शोध घेण्याचा ध्यास अशा दुसऱ्या टप्प्यावर हा कलावंत आलेला आहे. त्यांच्यातल्या कलावंताची तीव्र संवेदना जशी कृषी संस्कृतीतील वेधकता पकडते तशीच ती मातीखाली असणाऱ्या बीज अंकुरण्याच्या प्रक्रियेचा क्षणही टिपते. एकाच वेळी सृष्टीचे सौंदर्य आणि अध्यात्माचे आकर्षण या दोन्ही टोकांना ही चित्रे स्पर्श करतात.
कुलदीप हे कृषिभूषण सोपानराव अवचार यांचे चिरंजीव. सोपानराव यांनी आपल्या मुलास त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याची मुभा दिली आणि प्रोत्साहनही दिले. वडिलांनी जे पाठबळ दिले त्याचे कुलदीप यांनी सोने केले. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी या हिऱ्यास पलू पाडण्याचे काम केले. कर्नाटकातील गुलबर्गा येथील एम.एम.के. या महाविद्यालयातून चित्रकलेचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कुलदीप यांची देशभरात अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शने भरलेली आहेत. पुणे, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, गुलबर्गा आदींसह अनेक ठिकाणी त्यांनी इतर चित्रकारांसह पार पडलेल्या ‘ग्रुप शो’मध्ये सहभाग नोंदवलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धामध्ये त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे यश मिळविले आहे. सुवर्ण पदकासह चित्रकलेतील अनेक महत्त्वाची पारितोषिके त्यांच्या चित्रांना मिळाली आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या सी.सी.आर.टी या शिष्यवृत्तीचे ते मानकरी आहेत. परभणीच्या मातीतल्या या कलावंताच्या प्रतिभेने आता भाषा, प्रांत या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा