फेसबुकवर गप्पा मारता मारता ‘क्रिश ३’च्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्याचा घाट रोशन कंपनीने घातला आहे. ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’ चित्रपटाचा तिसरा सिक्वल ‘क्रिश ३’च्या प्रदर्शनासाठी ४ नोव्हेंबर ही तारीख राकेश रोशन यांनी जाहीर केली. त्याचबरोबर भारतीय सुपरहीरोची साय-फाय गोष्ट रंगवणाऱ्या या आधुनिक चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहितीही दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिली.
‘क्रिश ३’च्या पोस्टरचे स्वरूपही वेगळे असून नुकतेच हृतिकने त्याचे फेसबुकवर अनावरण केले आहे. ‘आजचे तंत्रज्ञान इतके वेगाने प्रतिसाद देणारे आहे, की एका क्षणात तुम्हाला तुमच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया फेसबुकवर मिळतात. त्यामुळे सोशल साइट्सारख्या माध्यमांचा मी चाहता आहे. प्रेक्षकांना या माध्यमाद्वारे थेट आपल्याबरोबर सहभागी करून घेता येते आणि ‘क्रिश ३’सारख्या चित्रपटासाठी तर हा अनुभव फार वेगळा ठरतो,’ अशी प्रतिक्रिया अभिनेता हृतिक रोशनने एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
‘क्रिश ३’च्या प्रदर्शनासाठी खरे तर दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, या मुहूर्तावर बहुतांशी लोक घरीच राहून पूजाअर्चा करण्यावर प्राधान्य देतात. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशीच रिकामे थिएटर पाहावे लागण्याची शक्यता जास्त हे लक्षात घेऊन ४ नोव्हेंबर ही तारीख प्रदर्शनासाठी अंतिम करण्यात आल्याची माहिती राकेश रोशन यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा