महापालिका विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागेवर नवे विरोधी पक्षनेते म्हणून कृष्णाहरी दुस्सा यांची वर्णी लागली खरी; परंतु त्यावरून भाजपमध्ये गटबाजीला ऊत आला असून यात एकमेकांच्या विरोधात पत्रकबाजी केली जात आहे. तर पत्रकबाज नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविणार असल्याचे नवे विरोधी पक्षनेते दुस्सा यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दुस्सा यांची निवड ही ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून झाल्याचा आरोप मावळत्या विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर व ज्येष्ठ नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की यांनी केला आहे. त्यावरून राजीनामा देण्याची भाषाही वापरली गेली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गोंधळ वाढला असून त्यातून पक्षाची प्रतिमा मलिन होत चालल्याचे दिसून येते.
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस व शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख यांच्यातील चर्चेनुसार विरोधी पक्षनेते म्हणून कृष्णाहरी दुस्सा यांची निवड झाली असताना त्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजयुमोचे सरचिटणीस राजकुमार पाटील, शहर उत्तर-पूर्व मंडल अध्यक्ष लक्ष्मीकांत गड्डम, शहर मध्य-पूर्व अध्यक्ष जय साळुंखे, माजी नगरसेवक मधुकर वडनाल आदींनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात या सर्वानी निवेदन प्रसिद्ध करून नगरसेविका रोहिणी तडवळकर व प्रा. मोहिनी पत्की यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे पक्षाकडे न देता थेट पालिका आयुक्तांकडे सादर करावेत, असे आव्हानही देण्यात आले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा यांनी पत्रकबाजी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याबाबचा अहवास प्रदेशाध्यक्ष व शहराध्यक्षांकडे सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असलेल्या सहा-सात नगरसेवकांनी संधी मिळाली नसल्याचा राग मनात धरून विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीत आर्थिक व्यवहार झाल्याच्या वावडय़ा उठविण्यात आल्याचे दुस्सा यांनी सांगितले. या आरोपामुळे आपणासह पक्षाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader