चोपडा कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ
केंद्र शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे साखर कारखानदारी व शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रात मागील कालखंडात ग्राहकाभिमुख निर्णय झाल्याने शेतकरी कर्जात अडकल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नमूद केले. जगात साखरेचे उत्पादन वाढले तर देशात ६७ लाख टन साखर अतिरिक्त निर्माण झाली. महाराष्ट्रात २० लाख टन साखर पडून असल्याने साखरेचे दर कोसळले. त्याचा परिणाम कारखानदारीवर झाला आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. हे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील ५० लाख टन साखरेचा ‘बफर’ साठा करून केंद्राने पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका आपण मांडणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०व्या गळीत हंगामास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते. याप्रसंगी आ. जगदीश वळवी, माजी आमदार दिलीप सोनवणे, पणन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, पं. स. सभापती डी. पी. साळुंखे, बाजार समिती सभापती गिरीश पाटील आदी उपस्थित होते.
अतिरिक्त साखर असताना आयात बंद करण्याचा निर्णय घेण्याची गरज आर. आर. पाटील यांनी मांडली. खरेदी कर आणि आयात करातून कारखान्यांना सवलत मिळावी म्हणून आपण मंत्रिमंडळात आणि केंद्रापुढे वकिली करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कारखाने वाचविण्यासाठी संचालकांनी काटकसर करावी. कामगारांनी व्यवसाय टिकावा हा दृष्टिकोन ठेवून हक्कांसाठी भांडावे. सभासदांनी ऊस लागवड करावी तरच कारखाने टिकतील, अन्यथा सहकारातील कारखानदारी मोडीत निघण्यास अनुकूल परिस्थिती दिसत असल्याचा धोकाही त्यांनी दाखविला.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी शेजारील कारखान्याप्रमाणे उसाला भाव देणार असल्याचे जाहीर केले. बाहेरच्या कारखान्याला ऊस न देण्याचे आवाहनही त्यांनी केले. अडीच लाख टन ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध असून पुढील वर्षी सुमारे साडेतीन लाख टन ऊस गाळप करण्यास मिळेल, असा आशावाद केला. कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. अरुण गुजराथी यांनी महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने आजारी असल्याने राज्य शासनाने त्यांना साहाय्य करण्याची मागणी केली.
ऊस खरेदी कर रद्द करावा. साखर आयात थांबवावी. तसेच जळगाव जिल्ह्य़ात यंदा दुप्पट पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. पालकमंत्री संजय सावकारे यांनी परतीच्या पावसाने जळगाव जिल्ह्य़ात पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा मांडला.
ज्वारी काळी पडली असून या ज्वारीची खरेदी व्हावी म्हणून आर. आर. पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ज्येष्ठ सहकारी म्हणून मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी, संचालक बी. बी. पाटील हेही उपस्थित होते.

Story img Loader