कोणत्याही प्रसंगाला ऐतिहासिक आधार नसतानाही केवळ ऐकीव माहितीवर एक चरित्रपट बनवण्याच्या धाडसाला काय म्हणावे, हे कळत नाही. आजच्या जमान्यात संत सखूची ही कहाणी मनाला भावत नाही, एवढे मात्र खरे..
संतांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये चमत्कारांची आणि पर्यायाने ट्रिक सीन्सची रेलचेल असणे अपेक्षित असते. चित्रपट माध्यमाने तंत्रज्ञानाच्या पातळीवर जोरदार प्रगती करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी आकर्षक वाटत होत्या. मात्र आता या गोष्टींचे काहीच वाटेनासे झाले आहे. कदाचित म्हणूनच ‘अशी होती संत सखू’ हा चित्रपट मात्र तंत्रज्ञान, कथा आणि कथेला भक्कम आधार या सगळ्याच निकषांवर कमी वाटतो.
दरवर्षी नेमाने वारीला जाणाऱ्या एका वयस्कर महिलेची (सुलभा देशपांडे) तब्येत बिघडल्याने तिला वारीला जाता येत नाही. त्या वेळी प्रत्येक संकटावर मात करून वारीला जाणाऱ्या संत सखूची आठवण तिला येते आणि ती आपल्या नातीला संत सखूची गोष्ट ऐकवते आणि त्याचबरोबर चित्रपट लोकांसमोर उलगडत जातो.
हा चित्रपट दिग्दर्शकाने फिल्मवर चित्रित केला असल्याचे बघताक्षणी जाणवते. डिजिटलमध्ये साधता येणारा परिणाम चित्रपटाला लाभला नाही. त्यातच चित्रीकरणही बरे म्हणावे इतपतच करण्यात आले आहे.
सर्वात जास्त खटकणारी बाब म्हणजे दिग्दर्शक तपशिलात खूप चुकला आहे. संत सखूच्या घरात इलेक्ट्रिकचे सॉकेट आणि वायर्स नसणार. पण या चित्रपटात ती दिसतात. त्याचप्रमाणे सखूचे सासर कितीही श्रीमंत असले, तरी त्या काळात ग्रॅनाइटच्या फरश्या आणि लाद्या घरात नसणार. दिग्दर्शकाला या गोष्टीचे भान असणे आवश्यक होते. पण त्याला ते नाही.
या चित्रपटात सखूच्या भक्तीची उदाहरणे दाखवली आहेत, ती पाहून सखू विठ्ठलभक्त कमी आणि स्किझोफ्रेनिक जास्त वाटते. दूध काढल्यानंतर तिला अचानक बाळकृष्ण दिसतो आणि ती त्याच्यासमोर (म्हणजे कोणीच समोर नसताना) दुधाचा हंडा ओतून देते. पाणी भरताना तिला श्रीकृष्ण, राधा आणि गोपिकांचे नृत्य दिसते आणि त्यात दंग होऊन ती पाणी भरायचे विसरते. अशा सुनेवर सासू वैतागणार नाही, तर दुसरे काय करणार! पण सखू संत असल्याने सगळेच योग्य वाटते.
संत सखूवर चित्रपट असल्याने अनेक भक्तिगीते आणि भजने या चित्रपटात आहेत. मात्र त्यांचे साऊंड मिक्सिंग चांगले न झाल्याने तबला, पखवाज यांचाच आवाज जास्त आणि शब्द कमी ऐकू येतात. पण चाली मात्र चांगल्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत निशा परुळेकरने साकारलेली संत सखू बरी जमली आहे. रडणे, विठ्ठलभक्तीत तल्लीन होणे, सासूची सेवा वगैरे सगळेच भाव तिने चांगले दाखवले आहेत. मिलिंद गवळीही संत सखूच्या नवऱ्याच्या भूमिकेत चांगला दिसतो. सुलभा देशपांडे यांना अनेक दिवसांनी पाहणे हा अनुभव सुखद आहे. त्यांनी आणि सुधीर दळवी यांनी खूपच चांगली कामे केली आहेत, तर कजाग सासूच्या भूमिकेत वर्षां सांदळे चोख बसल्या आहेत.
सिने टोला इंटा निर्मित
अशी होती संत सखू
निर्माता – जी. सी. गुप्ता व सुभाष शर्मा
दिग्दर्शक – सुभाष शर्मा
कथा व संवाद – अनिल कालेलकर
संगीत – नितीन हिवरेकर
कलाकार – निशा परुळेकर, मिलिंद गवळी, सुलभा देशपांडे, सुधीर दळवी, वर्षां सांदळे, अनिकेत केळकर व इतर.
संत सखूची फसलेली कहाणी!
कोणत्याही प्रसंगाला ऐतिहासिक आधार नसतानाही केवळ ऐकीव माहितीवर एक चरित्रपट बनवण्याच्या धाडसाला काय म्हणावे, हे कळत नाही. आजच्या जमान्यात संत सखूची ही कहाणी मनाला भावत नाही, एवढे मात्र खरे..
First published on: 19-05-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fail story of saint sakhu