गुन्हेगारी घटनांना लगाम लावण्यासाठी खरेखुरे पोलीस रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे बनावट पोलिसांचा मात्र शहरात धुमाकूळ सुरू आहे. पोलीस असल्याचे भासवून विविध भागात चोरटय़ांनी तीन महिलांकडून एकूण ८५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडय़ा लंपास केल्या. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे प्रकार नियंत्रणात आले नसताना आता बनावट पोलिसांच्या कारवाया रोखण्याचे नवीन आव्हान खऱ्या पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पोलीस असल्याचे भासवत महिलांना लुबाडण्याचे नवे तंत्र चोरटय़ांनी शोधले आहे. वर्दळीच्या भागात हे प्रकार घडू लागल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस असल्याचे भासवून दागिने लंपास करण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे प्रकार अव्याहतपणे सुरू असताना आता चोरटय़ांनी दागिने लंपास करण्यासाठी वेगळेच तंत्र अवलंबिले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटना लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रमुख रस्त्यांवर संशयित वाहनांची तपासणी व रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. असे असताना बनावट पोलीस महिलांच्या दागिन्यांची लुटमार करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंडित कॉलनी हा तसा वर्दळीचा परिसर. दुपारच्यावेळी प्रभा सुभाष पाटील या घरी पायी निघाल्या असताना चार जणांनी त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून थांबविले. पुढे संचारबंदी लागू असून त्यांना हातातील सोन्याच्या बांगडय़ा काढण्यास सांगितले. या बांगडय़ा पिशवीत ठेवण्याचा बहाणा करत संशयितांनी त्या लंपास करून पलायन केले. १५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगडय़ा बनावट पोलिसांनी लंपास केल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या स्वरुपाची दुसरी घटना दिंडोरी रस्त्यावरील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विमल रायजादे थांबलेल्या असताना दोन व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी आम्ही पोलीस असल्याचे भासवून या भागात चोऱ्या होत असल्यामुळे सोन्याची पोत पाकिटात ठेवण्यास सांगितले. या प्रकारात बनावट पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत गायब केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार दिवसाढवळ्या गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरूजी शाळेजवळ घडला. रस्त्याने पायी जाणाऱ्या रमाबेन मोहनलाल पटेल यांना एका व्यक्तीने अडविले. आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगून चोऱ्यांचे कारण देऊन बांगडय़ा पिशवित ठेवण्यास सांगितले. यावेळी हातचलाखी करून बनावट पोलिसाने ५० हजार रुपयांच्या बांगडय़ा गायब केल्या. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा