आवक वाढली तर कररूपाने (सेस) जादा पैसा मिळेल म्हणून बाजार समित्यांनी कांद्याच्या पळवापळवीसाठी नवा फंडा काढला आहे. कांद्याचा बोगस भाव काढून व्यापारात संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. या खेळात व्यापारी व ग्राहक व शेतकरीही भरडला जात आहे. कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यात असलेल्या राहता व श्रीरामपूर बाजार समित्याही या बनवाबनवीत आघाडीवर आहेत.    
दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याचे आगार असलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यात यंदा गावरान कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यातच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आदि राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक सडले. कांदा २ हजार रूपयांवरून ५ हजार रूपयांवर गेला. आता शेतकऱ्यांकडे २० टक्केकांदा चाळीत आहे. डिसेंबपर्यंत कांद्याचे काय भाव राहतील याचा अंदाज व्यापाऱ्यांना नाही. बाजारातील मागणी व पुरवठय़ातील फरकावर सध्या काद्यांला प्रतीिक्वटल ४ हजार ७०० ते ५ हजार ३०० रुपये सरासरी भाव आहेत. नगर जिल्ह्यात राहुरी, घोडेगांव, श्रीरामपूर, राहता व नगरला बाजार समित्यांच्या आवारात कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतात. समित्यांना आजच्या बाजारभावानुसार कर रुपाने क्विटंलमागे किमान ५० रुपये मिळतात. एका बाजार समितीत १५ हजार ते ३५ हजार कांदा गोण्याची आवक होती. त्यातून एका दिवसाला २ ते ५ लाख रूपयाचे उत्पन्न मिळते. साहजिकच आता बाजार समित्यांमध्ये आपल्याच आवारात कांद्याची जादा आवक व्हावी म्हणून स्पर्धा लागली आहे. त्यातून बनावट बाजार भाव काढले जात आहेत.
राहाता बाजार समितीने मागील आठवडय़ात कांद्याला ५ हजार ५०० रूपये विक्रमी भाव काढला. त्यादिवशी जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांच्या आवारात ४ हजार ते ४ हजार ८०० रुपये भाव होता. राहाता बाजार समितीत अवघ्या २९ गोणी कांद्याला हा भाव मिळाला. तेथेही सरासरी ४ हजार ते ४ हजार ८०० रुपये भाव निघाला. नंतर कोपरगांवला हा प्रकार घडला १५ ते २० गोण्याला ६ हजार रुपये भाव काढण्यात आला. सरासरी भाव तेथे ४ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत निघाले. दोन बाजार समित्यांचा फंडा श्रीरामपूर बाजार समितीने अवलंबला. २० गोणी कांद्याला ७ हजार रूपये भाव काढला. त्यापुर्वी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. जादा भाव मिळाल्याचा गलबला करण्यासाठी त्यांनी फटाके फोडले. पदाधिकाऱ्यांनी सत्काराचे नाटक केले पण श्रीरामपूर बाजार समितीतच १५ हजार गोणी कांद्याला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या बनवाबनवीमुळे व्यापारी व शेतकरी संघर्ष सुरू झाला आहे. राहुरी व घोडेगांव येथे शेतकऱ्यांनी ७ हजार रूपयांच्या भावासाठी कांद्याचे लिलाव बंद पाडले. शेतकरीही या प्रकारामुळे गोंधळून गेले आहेत. तर व्यापाऱ्यांना व्यवहार करणे कठीण झाले आहे. आता याप्रकराची चौकशी करून संबधीत व्यापारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कृषिमंत्री विखे यांच्या ताब्यातील बाजार समित्या कांदा भावाचा खोटारडा गलबला करून आमच्याकडे जादा भाव निघतो असा डांगोरा पिटत आहे.

Story img Loader