मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग तसेच मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी पक्षातर्फे शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अॅड्. रवींद्र पगार यांनी येथे दिली.
स्वाभिमान सप्ताहांतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन पगार यांच्या हस्ते झाले. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलतांना मालेगाव जिल्हा निर्मिती ही प्रशासकीय गरज असून दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्णत्वास येण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पगार यांनी दिले.मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग झाल्यास मालेगाव व धुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने हा रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन या रेल्वेमार्गासाठी आग्रही असले तरी मध्यप्रदेश सरकार त्यासाठी पुरेसा उत्साह दाखवत नाही. त्यामुळे या कामात विलंब होत असल्याचे स्पष्ट करत पक्षातर्फे त्यासाठी मध्यप्रदेश सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे उत्तम संघटन असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे संघटन आणखी मजबुत करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्याचे व नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांना पुरेशी संधी देतांनाच नि:ष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विजय पवार,चिटणीस किशोर इंगळे,भरत आखाडे,संजय माळी आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मालेगाव जिल्हा आणि रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार
मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग तसेच मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी पक्षातर्फे शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अॅड्. रवींद्र पगार यांनी येथे दिली.
First published on: 20-12-2012 at 02:56 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fallowup for malegaon distrist and railway path