येथील महापालिकेतील कारभार कसा चालतो, याचा विलक्षण नमुना नुकताच उजेडात आला असून यात मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकारात खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मनपातील सार्वजनिक बांधकाम विभाग किती बेजबाबदार आहे, याचीही झलक दिसून आली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ईदनिमित्त शहरात दरवर्षी प्रमाणे ४ ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उघडण्याची परवानगी मनपाने, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्या जागांची घोषणाही केली होती. या जागांबाबत व ज्या ४ ठिकाणी हे कत्तलखाने उभारण्यात आले तेथे इमारत, शेड अथवा एखादा तंबू होता काय, याची माहिती रतनलाल खंडेलवाल यांनी माहितीच्या अधिकारात मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास माहिती विचारली असता या विभागाने त्याला उत्तर देतांना या वर्षी असे तात्पुरते कत्तलखाने या विभागामार्फत उभारण्यात आले नाहीत, असे उत्तर देऊन माहिती लपविल्याचे उघड झाले आहे.    रतनलाल खंडेलवाल हे येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकलाचे संचालक आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात मनपाच्या या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास तात्पुरत्या कत्तलखान्यासंबंधी माहिती विचारली. विशेष म्हणजे, मनपाच्या आरोग्य विभागाच्या १४ ऑक्टोबरच्या एका पत्राचा संदर्भही यात दिला होता. हे तात्पुरते कत्तलखाने कोणत्या स्वरूपात उघडण्यात आले, तसेच त्यांचे क्षेत्रफळ किती, त्यासाठी आणलेले साहित्य व त्यास लागलेला खर्च किती आहे, यांची संपूर्ण माहिती व कत्तलखान्यांचे छायाचित्र देण्याची मागणी माहिती अधिकारात केली होती.
मनपाच्या या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने आपल्या स्वाक्षरीने व शिक्क्यासह रतनलाल खंडेलवाल यांना कळविले की, या विभागामार्फत तात्पुरते कत्तलखाने यावर्षी उभारण्यात आलेले नाहीत. वस्तुत: अकोला मनपाच्या आरोग्य विभागाने १४ ऑक्टोबर २०१३ रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार अकोट फैल (अकबर प्लॉट), ताजनापेठ, मोमीनपुरा मशिदीसमोर, खदान (जिरा बावडीजवळ) व जुने शहर ताजनगर सुविधा हॉलजवळ अशा ४ ठिकाणांचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. या पत्रावर मनपा आयुक्तांची सही असून याच पत्रात मनपाच्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास असे आदेश देण्यात आले आहेत की, त्यांनी उपरोक्त चारी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे कत्तलखाने उभारण्याची व्यवस्था करून आवश्यक साहित्य पुरवावे. रतनलाल खंडेलवाल यांनी अकोला मनपाच्या अधिकाऱ्याला एक पत्र माहितीच्या अधिकारात लिहून या कत्तलखान्यांची माहिती, तसेच या ठिकाणी किती व कोणत्या प्राण्यांची कत्तल करण्यात आली व कत्तलीनंतर जनावरांचे जे अवशेष व अन्य जैविक कचरा यांची विल्हेवाट कशी लावण्यात   आली,    याबाबत   विचारणा केली असता मनपाने त्यांना लेखी माहिती देतांना स्पष्ट केले की, मनपा आयुक्तांच्या पत्रातील आदेशाप्रमाणे चार ठिकाणी तात्पुरत्या    स्वरूपाचे  कत्तलखाने उभारण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी किती व कोणत्या जनावरांची कत्तल करण्यात आली, याबाबतची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही, असे कळविले आहे.
उपरोक्त चार कत्तलखान्यांच्या ठिकाणी जो जैविक कचरा निर्माण झाला तो कंत्राटदारामार्फत उचलून नायगाव येथील मैदानात खड्डे खोदून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली, असे उत्तर ६ डिसेंबर २०१३ रोजी मनपाने दिले आहे.
वस्तूत: मनपाच्या या विभागाला तात्पुरत्या स्वरूपाचे कत्तलखाने उभारण्याची व्यवस्था करण्याचे व आवश्यक साहित्य पुरवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनीच दिले असून त्या आदेशाचे पालनही या विभागाने केले आहे तरीही माहितीच्या अधिकारात चक्क खोटी माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा