महापालिका आयुक्तांनी तयार केलेले चालू वर्षीचे अंदाजपत्रक कोसळले असून केवळ तोटा दाखवावा लागू नये, यासाठी विकासकामांसाठीच्या निधीचे वर्गीकरण करून वाढीव खर्च व तूट भरून काढली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांना अंदाजपत्रकाचा अंदाजच आलेला नाही, प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे विकासकामे थांबणार आहेत, अशी थेट टीका सोमवारी मुख्य सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली.
महापालिकेच्या चालू वर्षांतील अंदाजपत्रकात विविध विकासकामांसाठी तसेच भांडवली कामांसाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यातील तब्बल १०८ कोटी रुपये इतर कामांसाठी आणि पगारासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. त्यातील ७० कोटी रुपये पगारासाठी आणि उर्वरित पैसे विद्युत, आरोग्य, व्हेईकल डेपो, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान या खात्यांसाठी वर्ग केले जाणार आहेत. या विषयावरील चर्चेत यंदाचे अंदाजपत्रक कोसळल्याचेच स्पष्ट झाले. गेल्या नऊ महिन्यात शहरात फारशी विकासकामे झालेली नसताना १०८ कोटींचे वर्गीकरण करावे लागत आहे, ही बाब गंभीर आहे, अशी टीका सभेत सदस्यांनी केली.
सभागृहनेता सुभाष जगताप, काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, तसेच मुक्ता टिळक, अविनाश बागवे, आबा बागूल यांची भाषणे झाली. संपूर्ण अंदाजपत्रक कोसळले असून ते कोसळल्यामुळे तूट न म्हणता वर्गीकरणातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. फक्त शब्दांचे बदल करून तूट भरून काढण्याचाच हा प्रकार आहे, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. अंदाजपत्रक लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याचा आढावा घ्या अशी सूचना मी केली होती. मात्र, तसे झाले नाही. आढावा घेतला असता, तर ही वेळ आली नसती. प्रशासनाने चुकीचे अंदाजपत्रक सादर केले होते, तेच वर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे आज सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
चालू वर्षीचे अंदाजपत्रक ३२०० कोटींचे असले, तरी विकासकामे मात्र फक्त तीन-चारशे कोटींचीच होणार आहेत. तसेच भांडवली कामांच्या निधीतही कपात केली जाणार आहे, अशी टीका बागूल यांनी केली. नवीन कोणतीही कामे चालू करू नका, असा आदेशच सर्व खातेप्रमुखांना देण्यात आला आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळेच हा आदेश देण्यात आला असल्याची तक्रार यावेळी बागवे
यांनी केली.

Story img Loader