बल्लारपूर वन परिक्षेत्रांतर्गत कारवा-बल्लारपूर मार्गावरील भागरती नाल्यात मंगळवारी पहाटे मादी बिबटचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मुख्यमंत्र्यांच्या ताडोबा सफारीनंतर दोनच दिवसांनी ही घटना घडल्याने वन विभाग हादरला आहे. मृत बिबटय़ाचे दात व मागच्या पायाची नखे कुऱ्हाडीने कापून नेल्याने प्रथमदर्शनी शिकारीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य चांदा वन विभागांतर्गत येणाऱ्या बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा-बल्लारपूर मार्गावरील जंगलात एक हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरात सोमवारी गावकऱ्यांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जेवणावळी संपल्यानंतर मुले भागरती नाल्यात खेळत होती. खेळता खेळता एक मुलगा दूर गेल्यानंतर त्याला नाल्यात बिबट पडलेला दिसला. त्यामुळे तो घाबरून मंदिरात परतला. सायंकाळी घराकडे परत येताना मुलांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी ही घटना बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोरे यांना भ्रमणध्वनीवर कळविली. रात्री उशीर झाल्यामुळे मोरे व सहायक वनाधिकारी अस्वले यांच्या नेतृत्त्वातील वन खात्याचे पथक आज पहाटे घटनास्थळी गेले असता बिबट कक्ष क्रमांक ४९३ मध्ये भागरती नाल्यात मृतावस्थेत पडून होता. त्याच्या मागील दोन पायांची नखे तसेच दात कुऱ्हाडीने कापून नेलेले होते.
कारव्याच्या जंगलात शिकाऱ्यांनी शिकार केल्यानंतर मृतदेह नाल्यात लपवून ठेवला असावा, यानंतर रात्री केव्हातरी शिकाऱ्यांनी नखे व पंजा कापून नेले असावेत, अशी शंका आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुळकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी मोरे, सहायक अस्वले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बिबटय़ाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृत मादी बिबटय़ाचे वय अंदाजे दीड वष्रे असून वनाधिकारी नैसर्गिक मृत्यूचा दावा करीत आहेत. बिबट पाणी पिण्यासाठी नाल्यात आला असावा आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा, असे सांगत असले तरी मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण वनाधिकाऱ्यांकडेही नाही. मात्र घटनास्थळावरील पुरावे व परिस्थिती बघितली तर ही शिकार असल्याचे जाणवते. बल्लारपूरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबटय़ाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात बिबटय़ाच्या तोंडाला व पायावर जखमा दिसून आल्या.   

Story img Loader