किरकोळ कारणांमुळे पती-पत्नीतल्या नात्यात वादाची ठिणगी पडते. हा वाद इतका पराकोटीला जातो की त्याची परिणती थेट घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेपर्यंत जाते. अखेरीस न्यायालयात हा वाद गेल्यावर केवळ पती-पत्नीपुरताच हा वाद मर्यादित राहात नाही. या वादात चार वर्षांच्या मुलाचे भवितव्य टांगणीला लागल्याची जाणीव या दाम्पत्याला होते. मालेगाव न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रातर्फे ही जाणीव दोघांना करून देत समझोता करण्याचा आग्रह धरला गेल्यावर हे दाम्पत्य अंतर्मुख होते. न्यायालयीन पातळीवर सुरू असलेला त्यांच्यातील वाद औपचारिकरित्या मिटण्याच्या आधीच या दाम्पत्याचा सुखाचा संसार पुन्हा सुरू होतो. विस्कटलेल्या संसाराची गोड झालेली अशी कहाणी समाजाला नक्कीच प्रेरणा देणारी म्हणावी लागेल.
मालेगाव येथे वैभव व अनिता पवार या दाम्पत्याच्या जीवनात आधी दुरावा निर्माण होण्याची व नंतर गोड कहाणीत तिचे रूपांतर होण्याची ही घटना नुकतीच घडली आहे. किरकोळ कारणांमळे पती-पत्नीतील वाद घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत गेल्यावरही वेळीच आपआपसातील सामंजस्याने मिटविता येऊ शकतो. सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर या दाम्पत्याचा संसार सुरूवातीच्या दीड-दोन वर्षांपर्यंत सुखेनैव सुरू होता. मात्र अन्य कोणत्याही कुटूंबात किरकोळ स्वरूपाच्या कुरबुरी व्हाव्यात तशा याही दाम्पत्यामध्ये झाल्या. त्यातून मतभेद वाढत गेले. तीन वर्षांपूर्वी अनिताने आपल्या लहानग्या बाळासह माहेर कल्याण गाठले. कल्याणच्या न्यायालयात अनिताने पतीविरूध्द खावटी तसेच कौटूंबिक हिंसाचार कायद्यान्वये दावे दाखल केले. तेथील समूपदेशन केंद्रात हा वाद गेल्यावर त्यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात यश आले नाही.
ईकडे वैभवही वेगळ्याच स्थितीत. आईचे निधन झालेले. वृध्द वडिलांचा सांभाळ करताना तोही मेटाकुटीला आलेला. मालेगावच्या न्यायालयात हिंदू विवाह कायद्यान्वये अनिताने नांदावयास यावे म्हणून त्याने दावा दाखल केला. वैभवच्या वकिल  विद्या देवरे-निकम यांची भूमिका महत्वाची ठरली. वकिलांनी पक्षकारांना नीट समजावून सांगितले तर एखादा कौटुंबिक वाद मिटविणे किती सहजशक्य असते, हे यानिमित्ताने दिसून आले. हा खटला न्यायमूर्ती आर. एस. जयस्वाल यांच्याकडे अर्ज करून हे प्रकरण न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राकडे सोपविण्याची अ‍ॅड. निकम यांनी विनंती केली. अनिताला समजावत पती-पत्नीमधील वाद मिटविण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. अनिताची वकिल बी. बी. पावसे यांनीही समझोत्यातच उभयतांचे हित दडले असल्याची भूमिका घेतली. परस्पर विरोधी दोघा पक्षकारांच्या वकिलांनी केलेल्या अशा प्रयत्नांमुळे हा समझोता घडून येण्यासाठी पाश्र्वभूमी तयार झाली. मध्यस्थी केंद्राचे न्या. एस. आर. भदगले यांच्यापुढे हे प्रकरण आल्यावर वादास फार मोठे कारण नसल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनीही उभयतांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या भांडणामुळे मुलाच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याच्या धोक्याची त्यांनी जाणीव करून दिली. उभयतांमध्ये पुन्हा एकांतात चर्चा घडवून आणण्यात आली. या चर्चेत एकत्रित संसार करण्यास दोघे राजी झाले. या मतैक्यामुळे सर्वच सुखावले. तीन वर्षे एकमेकांपासून दूरावलेले हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आले.
मालेगाव तालुका विधी सेवा समितीतर्फे अपर जिल्हा न्यायाधीश के. जी. राठी यांच्या हस्ते या दाम्पत्याचा नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला.

Story img Loader