कृषीमालाच्या दरातील चढ-उतार तसा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना नवीन नाही, परंतु दुष्काळाच्या छायेमुळे पेरणी अडचणीत सापडली असताना आणि महागाईने कळस गाठला असताना येवला तालुक्यात मोठय़ा कष्टाने पिकविलेल्या मिरचीला केवळ दीड रुपये किलो इतकाच भाव मिळाल्याने बळीराजाची अस्वस्थता आणखी वाढली आहे. या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मिरची ओतून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कधी गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे, तर कधी अक्षरश: मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे नाशिक जिल्हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत असतो. कांद्याप्रमाणे इतर कृषीमालातील चढ-उताराचे हे झटके शेतकऱ्यांना सोसावे लागतात. यंदा त्यात येवला तालुक्यातील मिरची उत्पादकाची भर पडली आहे. पुरणगाव येथील बाबा थेटे यांच्या मिरचीला हे मातीमोल दर मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी त्यांना असा फटका बसला. गेल्या वर्षी मोठय़ा अडचणीवर मात करत त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले होते. भाव नसल्याने घरातील वस्तू विकून त्यांची साठवणूक केली, परंतु नंतर पावसाळी हवामानामुळे कांदा खराब होऊन खाली बसू लागला, पण भाव काही वर आले नाहीत. यंदाही पावसाअभावी बाजरी, मका, कांदा, कापसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. टोमॅटोलाही फारसा भाव मिळाला नसताना मिरचीची तीच गत झाल्याची भावना थेटे यांनी बोलून दाखविली. यंदा पावसाची स्थिती यथातथाच राहिल्याने कोणतेही नवीन संकट नको म्हणून त्यांनी २९ गुंठे जमिनीत मिरचीची लागवड केली होती. सिताराचे बियाणे चांगले फुलून उत्पन्नही आले, मात्र मिरचीच्या उत्पादनासाठी जितका खर्च आला, तितका भरून निघणेही अवघड झाले. मागील १५ ते २० दिवस मिरचीला सरासरी एक हजार प्रति क्विंटल दर मिळाला. १९ क्विंटलचे १९ हजार रुपये झाले. २९ गुंठय़ांची मिरची लागवडीपोटी एकूण २८ हजार खर्च झाला असून, तीन क्विंटल मिरची तोडण्यासाठी ९३० रुपये खर्च आला, शिवाय मार्केटमध्ये आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च लागतो तो वेगळा. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीत मोठय़ा उमेदीने ते आले. मात्र मिरचीला दीड रुपया किलो लिलावात भाव मिळाला. यातून खर्चही भरून निघणार नाही मग हे उत्पन्न काय उपयोगाचे, असा सवाल थेटे यांनी उपस्थित केला. या दरामुळे त्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर मिरची ओतून निषेध नोंदविला.
मिरची अवघी दीड रुपये किलो!
कृषीमालाच्या दरातील चढ-उतार तसा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना नवीन नाही, परंतु दुष्काळाच्या छायेमुळे पेरणी अडचणीत सापडली असताना आणि महागाईने कळस गाठला असताना येवला तालुक्यात मोठय़ा कष्टाने पिकविलेल्या मिरचीला केवळ दीड रुपये किलो इतकाच भाव मिळाल्याने बळीराजाची अस्वस्थता आणखी वाढली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-09-2012 at 09:22 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famine drought farmar pepper