मागचे सपाट, पुढचे पाठ!
दोन जिल्ह्य़ांतच फिरणार पथक
दुष्काळाची पाहणी करण्यास येणारे केंद्राचे १२ सदस्यीय पथक औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हयांत मात्र फिरकणार नाही. जालना जिल्हयातील अंबड व घनसावंगी, तसेच बीडमधील आष्टी व पाटोदा तालुक्यांत काही गावांचा दौरा पथकातील सदस्य करणार आहेत. यापूर्वी एस. ए. सिक्का यांनी मराठवाडयातील दुष्काळाचा व दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सरकारला सादर केला. तथापि त्या शिफारशीतून काही ठोस निष्कर्ष पुढे आले नाहीत. बीड जिल्ह्य़ातील अवर्षणप्रवण तालुक्यांत बंधारे बांधण्यासाठी काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळेल, असे सांगितले जाते. केंद्रीय सहसचिव संजीव चोप्रा पथकाचे प्रमुख आहेत. अवघ्या दोन दिवसांत दुष्काळाची पाहणी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठवाडयातील ८ हजार ५४०पैकी ४ हजार ९७९ गावांची पैसेवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी झाल्याने दुष्काळाची तीव्रता तपासून केंद्राकडून काय मदत देता येईल, याची पाहणी करण्यास हे पथक पाठविले जाते. यापूवी केलेल्या पाहणीतून काय निष्पन्न झाले, याची उत्तरे अधिकाऱ्यांकडे नाहीत. परिणामी, दौरा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुष्काळाची तीव्रता कळावी, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ दोन दिवसांत मराठवाडयातील सर्व जिल्हयांचा दौरा शक्य नसून औरंगाबाद व उस्मानाबादची पाहणी होणार नाही. तेथील माहिती सदस्यांना दिली जाणार आहे. मराठवाडयातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आजही मराठवाडयात ३०७ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्यासाठी औरंगाबाद विभागात आतापर्यंत ८० कोटी खर्च झाले. अजून ३४ कोटींची मागणी प्रशासनाने केली आहे. या पाश्र्वभूमीवर दुष्काळी भागातील केंद्राच्या या सदस्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो. केंद्र सरकारकडे दुष्काळ निवारणासाठी दिलेला आराखडा एकदा फेटाळून लावल्यानंतर आता पुन्हा मदतीसाठी नव्याने मागण्या नोंदविल्या जाणार आहेत.
दरम्यान, ऑक्टोबरमधील भूजल पातळीच्या सर्वेक्षणानंतर उन्हाळयातील टंचाईसाठी किती रक्कम लागू शकेल याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. नांदेडचा आराखडा २५ कोटींचा असून बीड, उस्मानाबाद, जालना व औरंगाबादचे आराखडे ३५ ते ४० कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उस्मानाबादेतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी रेल्वे वाघिणीने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बीड व उस्मानाबादमधील जनावरांच्या ३ छावण्यांत आजही ५ हजार ६३१ जनावरे असून, येत्या काही दिवसात चाऱ्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकणार आहे. या पाश्र्वभूमीवर पथकाकडून केल्या जाणाऱ्या शिफारशीवर विचार होणार का, याची उत्सुकता आहे. पथकाची अभ्यासाची पद्धत कोणती, कोणत्या निकषाच्या आधारे पाहणी होणार हे अजून प्रशासनालाही ठाऊक नाही. त्यामुळे कमी वेळेत जेवढी दुष्काळाची गंभीर स्थिती दाखविता येईल, याचे नियोजन करण्याचे काम सुरू झाले आहे.

Story img Loader