खाशाबा जाधव राज्य कुस्ती स्पर्धा
रंजीत नलावडे, अक्षय डेळेकर, विक्रम कुराडे, रेश्मा माने, माधुरी घराळे (कोल्हापूर), किरण वरपे, प्रदिप फराटे, मनिषा दिवेकर, अश्विनी बोराडे (पुणे) या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंसह राज्यातील १० जिल्ह्य़ांच्या संघातील सुमारे २७० मल्लांचे आज ‘स्व. पै. छबूराव लांडगे क्रीडानगरीत’ आगमन झाले. उद्या सकाळपासून प्रथम
फेरीतील लढतींना सुरुवात होणार
आहे.
राज्य सरकारची प्रतिष्ठेची स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस उद्यापासून (शुक्रवार) शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानात सुरुवात होत आहे. या संकुलास नगरचे नामवंत पहेलवान स्व. लांडगे यांचे नाव देण्यात आले आहे. लढतींना सकाळपासूनच सुरुवात होत असली तरी उद्घाटन समारंभ सायंकाळी ४ वाजता होत आहे. पालकमंत्री बबनराव पाचपुते, युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार दादा कळमकर, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे व पदाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली, तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
आज दुपारपासून खेळाडू, पंच, कोच, कुस्ती संघटक, राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांचे आगमन सुरु झाले. सर्व संघ दाखल झाल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली. स्पर्धा पुरुषांच्या विविध वजन गटातील ग्रीको रोमन व फ्रि स्टाईल, तसेच महिलांच्या विविध वजन गटातील ग्रीको रोमन पद्धतीने होणार आहेत. आज पुरुष ५५ व ६६ किलो गटातील व महिलांची ४८ व ५५ किलो गटातील वजने घेण्यात आली, नियमानुसार वजने घेतल्यानंतर उद्या सायंकाळपर्यंत त्यांच्या लढती पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यामुळे या लढती सकाळपासुन सुरु केल्या जाणार आहेत.
उद्या पुरुषांची ६०, ७४, ८६ किलो गटात व महिलांची ५१, ४९ किलो गटातील वजने होतील तर रविवारी पुरुषांची ८४ व १०८ किलो व महिलांची ६६, ६७ व ८२ किलो गटात वजने घेतली जातील त्यानुसार लढती होतील.
सायंकाळी दाखल झालेल्या संघांचे व्यवस्थापक, पंच, प्रशिक्षक यांचा नियमांबाबतचा उजळणी वर्ग घेण्यात आला. खेळाडू, पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक यांची निवास, भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आज सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात
आली. उद्याही उद्घाटनानंतर
होणार आहे.