केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परवापासून (शनिवार) येथे आयोजित करण्यात आलेल्या बुक फेस्ट-२०१२ या पुस्तक प्रदर्शनात प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर, संगणकतज्ञ विजय भटकर, अभिनेते सचिन खेडेकर, उद्योगपती विठ्ठल कामत, मिलिंद गुणाजी आदी दिग्गज हजेरी लावणार आहेत. त्यांच्या येथे प्रकट मुलाखती होणार आहेत.
संयोजक आदी फाउंडेशनचे सचिव किशोर मरकड यांनी ही माहिती दिली. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन परवा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सचिन खेडेकर यांची मुलाखत मकरंद खेर घेणार आहेत. दि. ९ ला उद्योगपती विठ्ठल कामत यांची मुलाखत पत्रकार भूषण देशमुख घेणार आहेत. दि. १० ला महेश मांजरेकर यांची मुलाखत मकरंद खेर घेणार आहेत. दि. ११ ला मिलिंद गुणाजी यांची मुलाखत प्रा. गिता देशमुख (पुणे) घेणार आहेत. दि. १२ ला विजय भटकर यांच्याशी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत. सर्व मुलाखती सायंकाळी ६ वाजता होतील.
या सर्व प्रकट मुलाखतींबरोबरच दररोज रात्री अनाम प्रेम, प्रिया ओगले यांचा नृत्य झंकार ग्रुप, व्हिक्टर डान्स अकादमी, ताल अकादमी यांचे संगीतनृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील असंख्य पुस्तकांसह ५० नामवंत प्रकाशक सहभागी होणार असून या उपक्रमाच्या निमित्ताने सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मरकड यांनी दिली. नागरिकांनी प्रदर्शनाला मोठय़ा संख्येने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.        

Story img Loader