मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नाशिक घंटागाडीच्या अनियमिततेमुळे कचऱ्याचे शहर असे रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त घंटागाडीच्या ठेक्यावरून बराच गदारोळ झाला. हा ठेका मंजूर करण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टिने अटी व शर्तीचा समावेश करण्याची तयारी दर्शविली गेली. परंतु, त्याची प्रत्यक्षात काही अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. पालिकेच्या मालकीच्या घंटागाडय़ा ठेकेदाराच्या हाती सोपवून कचरा संकलनाचे काम केले जात आहे. कचरा संकलीत करण्याच्या कामात सातत्य नसल्याने रविवार कारंजा, वकील वाडी, पंचवटीतील हिरावाडी, काटय़ा मारूती आदी अनेक भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. काही भागात पाच ते सहा दिवसांपासून तर काही भागात आठ ते दहा दिवसांपासून घंटागाडी फिरकलेली नाही. मागील स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी ठेकेदाराला ही व्यवस्था शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याची सूचना केली होती. तथापि, ही व्यवस्था सुरळीत होण्याऐवजी पुरती कोलमडली आहे. वास्तविक, पावसाळ्यात कचऱ्याचे हे ढीग आरोग्याच्या प्रश्नांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. ही बाब ज्ञात असूनही पालिकेला नागरिकांचे हित महत्वाचे आहे की घंटागाडी ठेकेदाराचे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालिकेच्या मालकीच्या घंटागाडय़ांची प्रदीर्घ काळापासून नोंदणी झाली नसल्याने प्रादेशिक वाहतूक विभागाने त्या जप्त करण्याची तंबी दिली होती. त्यामुळे जाग आलेल्या पालिकेने घंटागाडय़ांची नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमुळे दररोज काही घंटागाडय़ा कार्यरत राहत नाहीत आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. आदर्श घंटागाडी योजना या नावाने सुरू झालेले कचरा संकलनाचे काम आज बिकट अवस्थेत पोहोचले आहे. ठेकेदाराकडून संकलनाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जाते किंवा नाही, याची तपासणी करण्याची तसदी पालिकेने घेतली नाही. स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनीही ही व्यवस्था अद्याप अनियमित असल्याचे मान्य करत ती सुरळीत होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले. या कामातील अनियमिततेचा ठपका त्यांनी प्रशासनावर ठेवला. वादग्रस्त घंटागाडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी मनसेने हा चेंडू प्रशासनाकडे टोलविला आहे. सत्ताधारी व प्रशासन यातील टोलवाटोलवीच्या खेळात ठेकेदाराला मनमानीपणे काम करण्याची मोकळीक मिळाली आहे. त्याची परिणती शहराची वाटचाल कचऱ्यांचे शहर या मार्गावर जलदगतीने होत आहे.

Story img Loader