‘हैदराबादमध्ये ‘जंजीर’चे चित्रीकरण करीत आहे.. नवीन चित्रपटाची सुरुवात करताना नेहमीच मनात धाकधूक असते.’ प्रियांका चोप्राने ट्विटरवर ट्विट केले आणि अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ही शंका प्रियांकाच्या भल्यासाठी असून त्याने ट्विटरवरच प्रियांकाला त्याबाबत सांगितले आहे. ‘डॉन’ आणि ‘अग्निपथ’ या अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या दोन्ही चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केल्यानंतर आता प्रियांका ‘जंजीर’मध्येही काम करीत आहे. ‘जंजीर’ चित्रपटाचे निर्माते प्रकाश मेहरा यांचा मुलगा अमित मेहरा या चित्रपटाची रिमेक निर्मिती करीत आहे. त्यामुळे या गुणी दिग्दर्शकाने आपल्या आवडत्या अभिनेत्रीला, ‘तोचतोचपणा येणार नाही, याची काळजी घे,’ असा प्रेमाचा सल्ला दिला आहे.
फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या ‘डॉन’ या चित्रपटातही प्रियांकाने काम केले होते. त्यानंतर तिने हृतिक रोशनसह ‘अग्निपथ’मध्येही काम केले. आता ती ‘जंजीर’च्या तयारीला लागली आहे. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम करण्याचा प्रियांकाला छंदच जडला की काय, अशी शंका फरहानला आली आहे. त्यामुळे त्याने ट्विटरवर प्रियांकाला याबाबत सावधान केले आहे. ‘प्रियांका, अमितजींच्या तिसऱ्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करीत आहेस, याची तुला जाणीव आहे का? तू एका साच्यात अडकशील, अशी भीती वाटते,’ या शब्दांत फरहानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा