जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या १६ व्या लोकसभेचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार असल्याने या दिवशी अनेक मित्रमंडळींनी हा रणसंग्राम एकत्रित बसून पाहण्याचे बेत आखले असून त्यासाठी पनवेल, उरण, कर्जत, मुरबाड येथील शेतघरे (फार्म हाऊसेस) भाडय़ाने घेतली आहेत. शुक्रवारी सरकारने ड्राय डे घोषित केल्याने या दिवशीसाठी तळीरामांना लागणारा स्टॉक आजपासून जमा करण्यास सुरुवात झाली असून आपला उमेदवार निवडून आल्यास त्याच्या आनंदात आणि पराभव झाल्यास त्याच्या दु:खात पिण्याची तयारी करण्यात आली आहे. पण तळीरामांनी थोडे सांभाळून राहण्याची आवश्यकता असून पोलीसदादाचे या फार्म हाऊसवर बारीक लक्ष राहणार आहे.
देशात प्रथमच घेण्यात आलेले नऊ टप्प्यांतील मतदान सोमवारी समाप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील राजकीय पटलावरील चित्र स्पष्ट होणार आहे. १९८४ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याने दिल्लीचे तख्त उलटपलट होणार हे स्पष्ट दिसून येत आहे. यात तरुणाईचा मोठा सहभाग असल्याने जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांबरोबर या तरुणाईने हे सेलिब्रेशन करण्याचे बेत आखले आहेत. देशात या दिवशी ड्राय डे जाहीर करण्यात आल्याने तळीरामांची अडचण झाली आहे. त्यामुळे एखाद्या बारमध्ये जाऊन ढोसता येणार नसल्याने या मंडळींनी मुंबईजवळच्या फार्म हाऊसचा आधार घेण्याचे ठरविले आहे. फार्म हाऊसची आवड असणारा वर्ग हा श्रीमंतांमध्ये मोडत असल्याने या फार्म हाऊसवर एलईडी टीव्ही किंवा मिनी थिएटरची व्यवस्था आहे.
ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची वारंवार वेळ येत असल्याने अनेकांनी इनव्हर्टर अथवा डिझेल जनित्रांची व्यवस्था केलेली आहे. मुंबईपासून ४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील सुकापूर, नेरे, रिटघर, हरिग्राम या भागांत खूप मोठय़ा प्रमाणात फार्म हाऊस बांधण्यात आलेली आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांचे विस्र्तीण असे जुने फार्म हाऊस याच परिसरात आहे. या भागात अशी साठेक फार्म हाऊसेस आहेत. यातील बहुतांशी फार्म हाऊस शुक्रवारसाठी आरक्षित करण्यात आली असल्याची रिटघरचे सरपंच भूषण भोपी यांनी सांगितले. याव्यतिरिक्त उरण तालुक्यातील दिघोडे, नागाव, केगाव परिसरात १५-१६ फार्म हाऊस असून त्यांचेही आरक्षण झाले असल्याची माहिती उपलब्ध आहे. या दोन तालुक्यांपेक्षा कर्जत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अशी फार्म हाऊस असून त्यांची संख्या शेकडोच्या वर आहे.
कर्जतला जाण्यासाठीही दीड तासाचा वेळ पुरेसा असल्याने अनेकांनी तिकडे जाणे पसंत केले आहे. फार्म हाऊसवर १६ वी लोकसभा साजरी करण्यामध्ये एका विचाराचे, पक्षाचे सदस्य असल्याचे दिसून येते. फार्म हाऊसच्या मालकांनी या पाटर्य़ाचे एक तर आयोजन केले आहे किंवा ही फार्म हाऊस भाडय़ाने दिली आहेत. त्यामुळे एका फार्म हाऊसचे भाडे पाच ते सहा हजार रुपयांच्या घरात गेलेले आहे. हे तळीराम गुरुवारी रात्री उशिरा या फार्म हाऊसेसचा ताबा घेणार असल्याचे समजते.

Story img Loader