शेती अन् शेतकऱ्याची घडी विस्कटल्यास देश अस्थिर होईल,अशी भीती व्यक्त करून, साखरेचे दर स्थिर ठेवल्यास उसाला योग्य भाव देता येईल, असे मत जयवंत शुगर्सचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. ऊस उत्पादकांच्या व्यथा मांडताना, साखर उद्योग व शेतकरी वर्ग सावरण्यासाठी शासनाने कालबध्द कार्यक्रम हाती घेऊन सवलतीच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ  डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी कृष्णा-सरिता महिला बझारच्या संस्थापिका उत्तरा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. जयवंत शुगर्सचे विश्वस्त डॉ. अतुल भोसले, कार्यकारी संचालक एस. एस. कापसे, पृथ्वीराज भोसले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेंद्र पवार, धावरवाडीचे सरपंच सुनीता नलवडे, पंचायत समिती सदस्य धोंडीराम जाधव, संजय पवार यांची उपस्थिती होती.
जयवंत शुगर्सने आजपर्यंत इतरांच्या बरोबरीने वाटचाल केली आहे. ऊस दरातही इतर कारखान्यांची बरोबरी साधली जाईल, अशी ग्वाही देऊन  डॉ. भोसले म्हणाले, की  यंदा गाळप क्षमता २५०० टनावरून वाढवून ३५०० मेट्रिक टन करण्यात येणार आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आजही ६० टक्के लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. १२ महिने घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम निश्चित मिळाला पाहिजे. त्यासाठी शेतीच्या उत्पादन वाढीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, तर शासनाने कारखान्यांची कर माफी करावी. शेतकऱ्यांना शेती, पाणी व वीज यामध्ये सवलत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  
केवळ ऊस व साखरेचे उत्पादन शेतकरी तसेच कारखान्यांना परवडणारे नाही. उपपदार्थाची निर्मितीही तितकीच गरजेची आहे. त्यामुळे जयवंत शुगरनेही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या पाश्र्वभूमीवर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे, तर लवकरच शेतकऱ्यांसाठी ठिबकसिंचन योजना चालू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. साखर उद्योग टिकावा आणि ऊस उत्पादकासही योग्य ऊसदर मिळावा. याचा मेळ घालण्यासाठी शासनानेही आता पाऊल उचलणे गरजेचे आहे. पेट्रोलमध्ये जास्तीतजास्त इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात यावी. शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे, पाणी, वीज व खते यावर सबसिडी मिळावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या जयवंत शुगर्स पूर्ण क्षमतेने चालू राहिल. कारखान्याने गेल्या वर्षी १२.४८ रिकव्हरी प्राप्त करून पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तारळी नदीचे पाणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून, या विभागाचे लवकरच नंदनवन होईल. प्रास्ताविक एस. एस. कापसे यांनी केले.

Story img Loader