‘५ हजारांच्या खाली साखर विकू नका’
 प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षा कमी दरात साखर विक्री केल्यास ती कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर अडविण्यात येईल, असा इशारा देत आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सीताराम काकडे यांना देऊन सुमारे दोन तास त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. काकडे यांच्याशी कार्यकर्त्यांची वादावादीही झाली.
शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, वामन तुवर, हरिभाऊ तुवर, अनिल औताडे, बापू आढाव, हरिभाऊ पवार, युवराज जगताप, काशिनाथ चितळकर आदींसह कार्यकर्त्यांनी काकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले. रंगराजन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत साखर विकू नका, पाच हजार रुपयांपेक्षा कमी दरात साखर विकायची असेल तर विशेष सभा बोलावून निर्णय घ्या, अशी मागणी यावेळी संघटनेने केली.
मागील हंगामातील साखर, स्पिरीट व मळी विकण्यात आले आहे. त्यापैकी ४० हजार क्विंटल साखर शिल्लक आहे, अशी माहिती काकडे यांनी दिली. त्यावर कार्यकर्त्यांनी साखर व उपपदार्थ विकूनही मागील हंगामातील उसाचा अंतिम हप्ता का दिला नाही, असा सवाल केला.
काही काळ त्यांच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला, पण काकडे अधिक खुलासा करू शकले नाहीत. अशोक कारखान्याची तोडणी करताना मजूर पाचट जाळतात, तसेच दीड फूट टिपरे वर ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशी तक्रार करण्यात आली. शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी यांनी पाचरट जाळण्याचे बंद करण्यात आले आहे. तसे घडल्यास कारखान्याकडे तक्रार करावी. त्याची दखल घेतली जाईल. तोडणी योग्य पद्दतीने करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.     
उसाचा भाव आणि मटक्याचा आकडा
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागील हंगामातील साखरेचा उत्पादन खर्चाचा हिशेब मागितला. तो कार्यकारी संचालक काकडे यांना देता आला नाही. त्यावर जिल्हाध्यक्ष उंडे म्हणाले, उसाचा भाव म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, असे कारखान्याचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणतात, मग उत्पादन खर्च न काढता भाव कसा दिला? पहिला व दुसरा हप्ता म्हणजे अंदाजे काढलेल्या मटक्याच्या आकडय़ाप्रमाणेच आहे, अशी टीका त्यांनी केली.

Story img Loader