ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलालगत तळोळी नाईक या गावी पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात राजाराम ठाकरे (६०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
तळोधी नाईक येथील राजाराम ठाकरे यांनी ताडोबा प्रकल्पालगत सुभाष शेषवार यांची शेती भाडय़ाने घेतली होती. काल मंगळवारी दुपारी ठाकरे शेतीवर गेले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कुठेच ठावठिकाणा लागला नाही. यानंतर आज सकाळी कुटुंबीयांनी शोध घेतला असता तुतारी व रक्त शेतात सांडलेले दिसले. त्यामुळे शेतीलगत शोध घेतला असता जंगलाच्या काठाने ठाकरे यांचा मृतदेह दिसला. यात ठाकरे यांचे अध्रे शरीर वाघाने खाल्लेले होते. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळीच शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. मृत ठाकरे यांच्या कुटुंबीयांना वन खात्यााने १५ हजाराची तात्काळ मदत दिली. दरम्यान, परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून परिसरातील गावात सकाळी आणि संध्याकाळी वाघ दर्शन देत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.