कर्जबाजारीपणा व वसुलीच्या धास्तीने गेल्या ११ मार्चला विष घेतलेल्या तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकऱ्याचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. खासगी सावकारी व कर्जाचा आणखी एक बळी ठरलेल्या या शेतकऱ्याचे कुटुंब आता उघडय़ावर आले आहे.
अपसिंगा येथील परमेश्वर रुद्राप्पा अंदाणे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती होती. पैकी पाऊण एकर क्षेत्रावर त्यांनी द्राक्षबागेची लागवड केली. कमी जमीन असलेल्या अंदाणे यांनी बागायती शेतीच्या माध्यमातून कुटुंबाला स्थिरता आणता येईल, या उद्देशाने द्राक्षबागेची उभारणी केली. उर्वरित सव्वाएकर क्षेत्र त्यांनी अन्य पिकांच्या उत्पादनासाठी ठेवले. परंतु रब्बी हंगामात पेरलेली ज्वारी पाण्याअभावी उगवलीच नाही, अर्धा एकर क्षेत्रावरील कांद्याचे पीकही करपून गेले. तशातच सर्व मदार ज्या पिकावर अवलंबून होती, ती द्राक्षबागही प्रचंड मेहनत व खर्च करूनही पाणी न मिळाल्यामुळे करपली. शेतातील उत्पन्नाचा काडीमात्र आधार समोर दिसत नसलेले अंदाणे गेल्या महिन्याभरापासून मानसिक तणावाखाली होते. शिवाय खासगी सावकारांच्या वसुलीचा बडगा मागे होता. या त्राग्यातूनच त्यांनी विष घेतले. बँकेचे १७ हजार, तर खासगी मार्गाने दोन लाख असा सुमारे सव्वादोन लाख कर्जाचा डोंगर अंदाणे यांच्या डोक्यावर होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शेतीशिवाय उत्पन्नाचा इतर कोणताच मार्ग नसलेल्या अंदाणे यांच्या द्राक्षबागेला ऑक्टोबर छाटणीनंतर चांगले पीक आले होते. परंतु द्राक्षाचे पीक ऐन वाढीच्या अवस्थेत असतानाच पाणी कमी पडत गेले. विहीर व दोन कूपनलिका आटल्याने जानेवारीपासून त्यांच्या बागेला पाणी मिळाले नाही. त्यामुळे घड हळूहळू सुकून जळून गेले. पाऊण एकर बागेतून केवळ १३ हजार उत्पन्न त्यांना मिळाले.
पिकासाठी केलेला खर्चही शेतीतून न निघाल्याने सव्वादोन लाख कर्ज कसे फेडायचे या चिंतेने परमेश्वर अंदाणे यांना ग्रासले होते, असे त्यांचे बंधू भारत अंदाणे यांनी सांगितले. गेले सात दिवस सोलापूर रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी सकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.

Story img Loader