सभोवतालच्या प्रश्नांचे भांडवल करून सर्व समस्या आपल्यासमोर कशा उभ्या ठाकल्या आहेत, हे मांडणारे साहित्यिक पायलीला पन्नास असतील. मात्र, समस्यांच्या चक्रव्यूहात न सापडता त्याचे नेमके उत्तर शोधणारे वा कारणमीमांसा करणारे साहित्यिक तसे विरळाच! त्यातही आत्ममग्न मंडळींची संख्या मोठी राहते. समस्येत अडकून न पडता वा त्या प्रभावाचा स्पर्श होऊ न देता ही समस्या सोडवण्यास काय केले पाहिजे, यावर विचारपूर्वक काम करणारा कृतिशील साहित्यिक म्हणून रमेश चिल्ले यांची मराठवाडाभर ओळख आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या व मराठवाडय़ातला पाचवीला पुजलेला दुष्काळ या पाश्र्वभूमीवर चिल्ले यांनी निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल गावी २० शेतकऱ्यांचा गट तयार केला आणि अध्र्या एकरात ५५ हजारांचे उत्पन्न घेतले. आता बहुतांश शेतकरी यात सहभागी आहेत. चिल्ले व त्यांच्या शेतकरी गटातील सभासदांची मिरची निर्यात होणार आहे. करडखेल (तालुका उदगीर) येथे शेतकरी कुटुंबात रमेशचा जन्म झाला. आठवतील तेवढय़ा पिढय़ांत कोणी शासकीय सेवेत नव्हते अथवा उद्योगधंद्यातही नव्हते. शेती हाच उदरभरणाचा मार्ग. गावच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रमेशने शेजारच्या हेर गावी पायी ये-जा करून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. उदगीर तालुक्याच्या ठिकाणी अकरावी-बारावी व परभणी कृषी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान चंद्रकांत वानखेडे, अमर हबीब अशा मित्रांबरोबर छावा संघर्ष वाहिनीशी नाळ जुळली.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निपाणी येथील आंदोलन त्या काळी गाजले. शरद जोशींच्या भाषणामुळे चिल्ले प्रभावित झाले व संघटनेचे कार्यकर्ते झाले. संघटनेच्या विविध आंदोलनांत कारावासही भोगला. लिखाणाचे अंग हळूहळू विकसित करत ‘शेतकरी संघटक’मध्ये लिहिते झाले. कविता, ललित लेख या प्रकारातही रस घेतला.
‘पोरगं शेतकरी संघटनेच्या कामात वाहत जाईल’ अशी साधार भीती वडिलांना होती. पोराने शासकीय नोकरी करावी व शेतीतील त्रासदायक आयुष्यातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा. या इच्छेखातर रमेशने शासकीय नोकरी पत्करली. सावंतवाडी येथे कृषी अधिकारी म्हणून त्यांनी सेवा सुरू केली. जन्मापासूनच शेतीशी नाते. शिक्षणही शेतीचेच. त्यामुळे ग्रामीण व शेतीविषयक साहित्याकडे कल वाढला. प्रारंभी कवितेच्या माध्यमातून त्यांनी लिखाण सुरू केले. ऊर्मी, ग्रंथसखा, अक्षरगाथा, शब्दांकुर, भूमी, साधना यांसह सकाळ, सामना, तरुण भारत, गोडवा, अ‍ॅग्रोवन अशा दैनिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. नांगरून पडलेले शतक, मातीवरची लिपी, ओस झाल्या दिशा हे त्यांचे काव्यसंग्रह चर्चेत राहिले. अनेक अडचणींवर मात करत शेतीतून चांगले उत्पन्न घेणाऱ्या सुमारे १५० शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांनी शब्दबद्ध केल्या. निळे तळे, फुगा गेला फुटून, एक तळे नामानिराळे असे त्यांचे बालसाहित्यही गाजले. वंदना प्रकाशन (मुंबई), पद्मगंधा प्रतिष्ठान (नागपूर), आविष्कार साहित्य मंडळ (नांदेड) अशा विविध संस्थांच्या पुरस्काराबरोबरच कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर आदी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांच्या कवितांना दाद मिळाली.
साहित्यातील योगदानाबरोबर कृषी खात्यात नोकरी करून आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी त्यांचे प्रारंभापासून प्रयत्न राहिले. सेलू (तालुका वसमत) येथे पाणलोट विकास, लातूरमध्ये छतावरील पाण्याच्या पुनर्भरणासाठी प्रयत्न, तुरीचे पारंपरिक पीक घेण्याऐवजी टोकण पद्धतीने तुरीचे उत्पादन घेण्याचा प्रयोग स्वत:च्या शेतात राबवला. बदनापूर कृषी संशोधन केंद्राने याची दखल घेतली. लातूर जिल्हय़ात टोकण पद्धतीने सुमारे एक हजार हेक्टरवर तुरीचे उत्पादन घेतले जाते. ज्यातून एकरी सरासरी किमान दोन क्िंवटलचे उत्पादन वाढते. आपल्या प्रयत्नातून सुमारे ५० हजार क्विंटल तुरीच्या उत्पादनात वाढ करता आली, हे एक मोठे समाधान.
देशभर शेती व्यवसायात जे विविध प्रयोग होतात ते आपल्या भागात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करून शिरूर अनंतपाळ, निलंगा परिसरात गटशेतीस प्रारंभ केला. एप्रिल २०१२मध्ये शिवणी कोतल (तालुका निलंगा) गावच्या २० शेतकऱ्यांचा गट तयार केला. सिल्लोड येथे निर्यातक्षम मिरची तयार करणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांची भेट घडवून आणली. त्यातून सुरुवातीला चार शेतकरी तयार झाले. अर्धा एकरात मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यातून ५५ हजारांची प्राप्ती झाली. या वर्षी मसलगा, तुपडी, शिवणी कोतल व पानचिंचोली गावांतील सुमारे ३० शेतकऱ्यांनी २५ एकरांवर निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन घेतले. निर्यात करणाऱ्या मध्यस्थांशी करारही करण्यात आला. या शेतकऱ्यांसाठी दर आठवडय़ाला चिल्ले शेतीशाळा घेतात. लातूर जिल्हय़ातून प्रथमच त्यांच्या प्रेरणेने भाजीपाला निर्यात होणार आहे. मिरचीप्रमाणे टोमॅटोचे उत्पादनही घेतले जाणार आहे. एकत्रित शेतीमुळे बियाणे, खत व ठिबक सिंचनाचा खर्च कमी होतो. मालाची विक्री करताना आडत, तोलाई, मापई यासाठीही अधिक पैसे लागत नाहीत. त्यामुळेच भाजीपाल्याबरोबरच सेंद्रिय शेती व फूलशेतीचाही गट उभा केला. बँकांकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचे कामही ते स्वखुशीने करतात. बहुतेक वेळा साहित्यिक माणूस ‘मी आणि माझे साहित्य’ या शब्दजंजाळातच अडकलेला असतो. रमेश चिल्ले त्याला अपवाद!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा