शेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर यांना आज अमरावतीत आम्ही सारे  फोऊंडेशनच्या वतीने एक लाखाचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यानिमित्त-
मी विजय यशवंत विल्हेकर.. असे वाक्य कानावर आले तर पूर्ण नावाची ओळख देणारी ही कोण वल्ली, असा प्रश्न साहाजिकपणे आपल्यासमोर उभा ठाकतो. विजय दीनानाथ चव्हाण हे नाव आजच्या पिढीला माहिती आहे. हे नाव ऐकताच चित्रपटाचा महानायक समोर येतो, मात्र अशीच ओळख सांगणारे विजय यशवंत विल्हेकर हे ‘रिल’ लाईफमधील नव्हे, तर ‘रियल’ लाईफमधील महानायक आहेत.
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून तर अकोला व औरंगाबाद विद्यापीठाचे आंदोलन असो की, शेतकरी, शेतकरी संघटना यांची सुरू असलेली चळवळ असो विजय यशवंत विल्हेकर नावाचे हे कलंदर व्यक्तिमत्त्व आज साठीच्या उंबरठय़ावरही तसेच कार्यप्रवण आहे. दर्यापुरात जन्मलेले विजूभाऊ तसे चांगल्या खात्यापित्या घरचे. वडील स्वातंत्र्य सैनिक, तीन भाऊ, असे भरलेले कुटुंब. वडिलांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाचा प्रभाव व वारसा मुलांनीसुद्धा हिरिरीने उचललेला.. १२ एकराची शेती मुलांप्रमाणे सांभाळून समाजकार्य करणारे हे घर दर्यापूरच्या पंचक्रोशीत चांगलेच लोकप्रिय. विजूभाऊंचे बंधू अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावे, या आंदोलनातील  सक्रीय पुढारी. तरुण वयातच आंदोलनात उतरलेल्या या बंधूंकडून प्रेरणा घेत विजूभाऊही भारावलेलेच होते. अशाच वातावरणात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते अमरावतीत आले अन् संपूर्ण आयुष्याचीच दिशाच बदलून गेली. तो काळ होता जयप्रकाश नारायण नावाच्या वादळाचा.. जेपींचे आंदोलन असे संबोधन तरुणांच्या मुखावर होते. छात्र संघर्ष वाहिनीची माहिती विजूभाऊंना मिळाली अन् ते भारावून गेले.. त्यातच त्यांची भेट चंद्रकांत वानखेडे, देवेंद्र आंबेकर, कमल कारवा, अशा ध्येयवेडय़ा तरुणांशी झाली अन् पाहता पाहता विजूभाऊ या आंदोलनात सक्रीय झाले. जेपींची विचारसरणी खूप खोलवर रुजली व संपूर्ण जीवनालाच कलाटणी मिळाली. ते तत्वज्ञान जीवनाचे तत्वज्ञान झाले, असे विजूभाऊ आजही मानतात. जेंपीच्या प्रभावात संपूर्णपणे डुंबून गेलेले विजूभाऊ त्याच दरम्यान औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात उतरले. त्या आंदोलनातील प्रक्षोभक भाषा अन् जेपींची खोलवर जाणारी शांत वैचारिक पेरणी, अशा विरोधाभासी प्रवाहाचे मंथन विजूभाऊंना अस्वस्थ करू लागले, मात्र त्याच वेळी एका बैठकीत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी अशाच आक्रमक शैलीची गरज स्पष्ट केली अन् मग विजूभाऊंनी त्याही आंदोलनात उडी घेतली. काही काळ औरंगाबाद येथे व्यतित करून विजूभाऊ दर्यापूरला परतले.
दरम्यानच्या काळात बी.एसस्सी. आंदोलनात वाहून गेलेली होती. तसंही वडिलांना वाटत होतेच की याने पुणे येथे जाऊन अभिनय शिकावा, पण आईचा विरोध होता म्हणून अमरावती गाठली, पण तेही शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्याच वेळी चंद्रकांत वानखेडेंसारख्या हुशार तरुणाने आपल्या सर्व पदव्या आणि शिक्षणाची कागदपत्रे जाळून टाकून समाजकार्याचा वसा घेतला. तोही प्रभाव होताच म्हणून शिक्षणाला रामराम ठोकून आंदोलन हेच जीवितकार्य समजून विजूभाऊ कामाला लागले. तो काळ होता शरद जोशींच्या उदयाचा. शेतकरी संघटनेची बांधणी झालेली नव्हती. त्यांची ओळख कांद्याचे आंदोलन करणार नेता, अशीच होती. एक ‘जोशी’ शेतकऱ्यांचा विचार मांडतो, याबाबतच प्रथम साशंकता होती, मात्र त्यांचे विचार वाचायला मिळाले  अन् हे ‘बेणं’ काही वेगळं आहे, हे लक्षात आल्याचे विजूभाऊ सांगतात. अशातच दर्यापुरातील कार्यकर्त्यांनी शरद जोशींची सभा ठेवली. हजारोंनी लोक आले. मंडप, शामियाना असा सभेचा मोठा तामझाम होता. जोशी बोलायला उभे राहिले. त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले, हा तामझाम म्हणजे मृताच्या सोहळ्याला आपण जमलो आहोत, असे वाटते, असे म्हटले व त्याच वाक्याने शेतकऱ्यांसाठीची कळकळ विजूभाऊंना भावली. जोशींची मांडणी, त्यांचे तत्वज्ञान, देहबोली व साऱ्या प्रकाराने त्यांनी मनोमन शरद जोशींच्या नावाचा गंडा हाताला बांधला. अशा भारावलेल्या वातावरणात शेतकरी चळवळ फोफावू लागली. लहान मोठय़ा प्रश्नावर शेतकरी आक्रमक होऊ लागले व दर्यापूर परिसरातील शेतकऱ्यांचे नेतेपण आपोआप विजूभाऊंकडे आले. त्यामुळे पुढे शरद जोशींनी शेतकरी संघटनेची बांधणी अधिकृतपणे केली व या संघटनेचे पहिले तालुकाप्रमुख व अमरावती जिल्हा संघटक प्रमुख म्हणून विजूभाऊंच्या शिरावर जबाबदारी आली. छातीला ‘बिल्ला’लागला तो आजतागायत कायमच आहे.
संघटना आता वाढली पाहिजे म्हणून विजूभाऊंनी १९८२ मध्ये पहिली प्रचारयात्रा सायकलवरून काढली. ५ कार्यकर्त्यांच्या सहभागाने सुरू झालेली ही प्रचार यात्रा ‘बघता काय सामील व्हा’ असा गजर करीत तालुक्यात फिरू लागली. गावागावातून सायकली वाढत होत्या. कार्यकर्ते जुळत होते, पण संख्या मनासारखी होत नव्हती. यात्रेचा १२ वा दिवस होता. सायकल चालवून सर्वाच्याच हातापायाचे व कमरेचे हाल झाले होते. बाजूच्या शिवर गावात यात्रेचा मुक्काम होता, मात्र या गावात जाण्याचा मार्ग वावरातून होता अन् नांगरटी झाल्यामुळे या वावरातून सायकली उचलून न्याव्या लागल्या. इतके टोले घेऊनही लोकांना त्याची जाण नाही म्हणून यात्रेतील कार्यकर्त्यांना नैराश्य आले होते.
विजूभाऊंचा जीव ‘कावला’ होता. नको ती झंझट, असा विचार मनात तरळत असतानाच गावाची वेस आली अन् या वेशीवर स्वागताची जय्यत तयारी पाहून सारेच हरखले. या गावातील अरविंद माधवराव देशमुख या कार्यकर्त्यांने ही तयारी केली होती. लहानशा आजारपणामुळे या कार्यकर्त्यांला यात्रेत सहभागी होता आले नाही, मात्र त्याने यात्रा सुरू झाल्यापासून सुतकताई सुरू केली व १२ दिवसात कातलेल्या सुतांपासून तयार केलेला हार घालून सर्वाचे स्वागत केले. ही बाब समोर येताच यात्रेमागील लोकांची भावना या कार्यकर्त्यांना भावली अन् यात्रेचा जोम वाढला. ५ सायकलींवर सुरू झालेली ही यात्रा समारोपापर्यंत २०० सायकलींवर पोहोचली होती. हे पहिले यश होते. विजूभाऊ म्हणतात, ‘अरविंदबाप्पूने हार टाकून आमच्या मनातील पळपुटेपणाचा विचार हरविला.’ होय! ते खरेच ठरले. कारण पुढे प्रत्येक आंदोलन अन् विजय यशवंत विल्हेकर हे समीकरण रुजले.
८५ च्या दशकात शरद जोशींनी पुढाऱ्यांना गावबंदी आंदोलन पुकारले. तो काळ निवडणुकीच्या वाऱ्यांचा होता. दर्यापूरच्या सूतगिरणीची कोनशिला बसविण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण येणार होते. सर्व कार्यकर्त्यांनी गावबंदीची तयारी केली, मात्र रातोरात सर्वाना अटक करण्यात आली. फक्त दोघेच सुटले. विजूभाऊ व मधुकर गावंडे या दोघांनी गुपचूप एक झेंडा घेतला अन् हेलिपॅडवर गेले. शंकरराव हेलिकॉप्टरमधून उतरताच गर्दीतून उसळी मारत संघटनेच्या घोषणा देत दोघेही पुढे निघाले, मात्र खुद्द एस.पीं.नी धाव घेत यांना पकडले. हक्कासाठी भांडतो, कॉलर सोडा, असे एस.पीं.ना खडसावून सांगताच त्यांनी सोडले व सहकार्य करा, अशी विनंती केली. त्यानुसार मग निषेधाची घोषणा देत पोलीस स्टेशनमध्ये सभा रंगली, असा किस्सा आजही विजूभाऊ आवर्जून सांगतात.
दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची पहिली कर्जमुक्ती झाली. त्यातूनच मग कापूस आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहीद बाबू गेनू यांच्या स्मृती दिवसापासून या आंदोलनाची सुरुवात झाली.
जळतो रे कापूस। कापसाला वाचवा।।
रूम्हण्याचा हिसका। दिल्लीला दाखवा।।
अशा घोषणांनी सारा कापूस प्रश्न पेटला होता. विजूभाऊंनी सारा अमरावती जिल्हा पिंजून काढला. शेतकऱ्यांमधील असंतोष पेटविला. दर्यापुरात निघालेल्या रॅलीत तब्बल ८९ ट्रॅक्टर्स सहभागी झाले होते, हा आतापर्यंतचा विक्रम होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे लढताना विजूभाऊंचा सच्चा कार्यकर्ता, असा लौकिक वाढत होता. त्यातच स्वतंत्र भारत पक्ष नावाने शेतकरी संघटना राजकारणात उतरली. दर्यापूर मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबतच शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता आंदोलनापेक्षा या प्रश्नावर संवेदनशीलतेने काम झाले पाहिजे म्हणून विजूभाऊंनी अशा कामात झोकून दिले. अशातच स्वतंत्र भारत पक्षाने विजूभाऊंना मैदानात उतरविले. निवडणुकीची इच्छा नव्हती, पण नेत्याचा आदेश होता. स्वत: शरद जोशी प्रचाराला येणार होते. विजूभाऊंची बांधीलकी पक्की होती. त्यांनी शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या घरून आपल्या प्रचाराला प्रारंभ केला. जय-पराजय हा प्रश्नच नव्हता. या निमित्ताने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाहीच्या मोठय़ा व्यासपीठावर मांडता येतील, याचे समाधान त्यांना अधिक असल्याने मते मागण्यापेक्षा शेतकरी तत्वज्ञानच ते अधिक सांगत. शरद जोशींच्या सभेला झालेली गर्दी ही आतापर्यंतचा उच्चांक होता, पण सभेची गर्दी मतात परार्तित होत नाही, हे सत्य कळूनही पोटनिवडणुकीनंतरही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली तेव्हाही विजूभाऊंच्या बाबतीत खरे ठरले. राजकारणात गुंतून राहण्यापेक्षा त्यांनी संघटनेचा विचार वाढविला. दररोज किमान हजारभर पत्रे ते लिहीत. यासोबतच त्यांच्या विविध कवितांनी समाजमन ढवळून निघत असे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न त्यांनी लावून धरला. तो थेट राष्ट्रपतीपर्यंत पोहोचविला. कुठलाही सणवार त्यांनी अशा कुटुंबाविना साजरा केला नाही. आत्महत्या झालेल्या कुटुंबातील महिला भगिनींना एकत्र करून स्वत:च्या घरी अक्षयतृतीया केली, असे अनेक उदाहरणे आहेत. कुणालाही नमस्कार करण्यासोबतच त्याला आलिंगन देण्याची त्यांची पद्धतही समोरच्यासाठी जादूच्या झप्पीपेक्षा निश्चितच कमी नसते.        
अजब लग्नाची गजब कहाणी
लग्नच करायचे नाही. आंबेकर, चंदूभाऊ, कमल कारवा यांच्यासारखे समाजकार्याला वाहून घ्यायचे, हा ध्यास विजूभाऊंचा होता, पण वडिलांनी आग्रह केला. लग्न कर. समाजकार्यात आम्ही बाधा आणणार नाही, असा शब्द दिला अन् यवतमाळच्या दुर्गे परिवारातील सिंधूसोबत विजूभाऊंचा विवाह ठरला. देणे-घेणे हा प्रकारच नव्हता, पण सासऱ्यांनी विचारले, किती माणसे येतील, जेवणाचा अंदाज ठरवता येईल तेव्हा विजूभाऊ म्हणाले, आमचे पाहुणे ‘शिदोरी’ घेऊन येतील. त्यांना सवय आहे. तुमच्याच पाहुण्यांचे बघा. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे शिदोरी घेऊन गेले होते. मारुतीच्या पारावरून नवरदेव निघणार म्हणून घोडा आला होता, पण विजूभाऊंनी एका मित्राच्या गाडीवर मंडप गाठला. मंडप मस्तपैकी सजला होता तो शेतकरी संघटनेच्या घोषणा फलकांनी. मंडपात सारेच वऱ्हाडी ‘बिल्लेवाले’. लग्नांचे मंत्र सुरू झाले अन् तिकडे घोषणांनी मंडप निनादू लागला. सावधान! झाले की एक घोषणा, असा सारा प्रकार लग्नात होता. सकाळी नवरी घेऊन दर्यापूरला परत येत असतानाच कृषी विद्यापीठ आंदोलन ज्याच्या खांद्यावर बसून अनुभवले ते प्रभाकर तराळ यांचे निधन झाल्याची वार्ता विजूभाऊंना समजताच ते तडक त्यांच्या घरी गेले अन् सर्व विधी संपल्यावर परतले. या वल्लीचा संसार वादळाप्रमाणे सांभाळायचा आहे, याची जाणीव सिंधूताईंना पहिल्याच दिवशी झाली ती आजपर्यंत उत्तमपणे सांभाळली आहे.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Story img Loader