जनावरांना प्यायला शेतीशिवारात पाणी नाही. तेव्हा द्राक्षबागा कशा जोपासायच्या, या विवंचनेने असणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्य़ातील ८० टक्के द्राक्षबागांना कुऱ्हाड लावली आहे. तोडलेल्या बागेचे सरपण एवढाच उपयोग होत असल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत.
पारंपरिक पिकांना बगल देत गेल्या तीनचार वर्षांपासून जिल्ह्य़ातील कौडगाव, चिलवडी, अंबेजवळगा, मानमोडी, आळणी, झरेगाव, साकत, वालवड, जाकेपिंपरा, आंतरगाव, कुंभेफळ, जवळा (नि.), इडा, अपसिंगा व कामठा येथील शेतकऱ्यांनी आपला कल द्राक्ष उत्पादनाकडे वळविला. ऐपतीनुसार शेतामध्ये बोअर, विहिरी आदी पाण्याचे स्रोत निर्माण करून शेतकरी हळूहळू बागायती पिकांकडे वळू लागले होते. द्राक्षबागेच्या लागवडीचा खर्च अधिक असला, तरी ठोक उत्पन्न देणारे हे पीक असल्याने गेल्या तीनचार वर्षांमध्ये द्राक्ष लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता.
मात्र, सलग दोन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा होत राहिल्याने द्राक्षबागायतदारांपुढे पाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या लागवडीपासून ते फाउंडेशनची उभारणी करेपर्यंत एकरी सुमारे दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येणाऱ्या या पिकावर दुष्काळामुळे संकट कोसळले आहे. २०११-१२ मधील पावसाळ्यात फारच कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. बोअर, विहिरी आदी पाण्याचे स्रोत डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच कोरडेठाक पडल्याने द्राक्षबागांना पाणी मिळणे कठीण झाले. काही शेतकऱ्यांच्या बागांना गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी न मिळण्यामुळे त्या द्राक्षबागांची यंदाच्या हंगामात फळधारणा झाली नाही. तर काही शेतकऱ्यांच्या बागांना यंदाच्या हंगामात प्रारंभी पीक लागले. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्याने द्राक्षाचे कोवळे घड अक्षरश: सुकून गेले.
तशातच या पुढील काळात या द्राक्षबागा कशा जगवायच्या या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे त्यांना कु ऱ्हाड लावणे हाच अंतिम पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. गेल्याच आठवडय़ात तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील आदम अकबर सय्यद या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रातील द्राक्षबाग तोडून काढली. तोडलेल्या द्राक्षबागा पाणी नसल्यामुळे तोडून काढल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक शेतकऱ्यास पाण्याची समस्या भेडसावत असल्याने व जून महिन्यात जर वेळेवर पावसाचे आगमन न झाल्यास आगामी काळात जिल्ह्य़ातील ८० टक्के द्राक्षबागांना कु ऱ्हाड लागली जाणार असल्याचे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer removed greaps plants from farm due to drought
Show comments