चिखली तालुक्यातील वरखेड येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी, १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. तो घरातील कर्ता पुरुष असल्याने या आत्महत्येमुळे कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच असून आज वरखेड गावातील संजय संतोष मुंढे या चार एकर क ोरडवाहू जमिनीच्या मालक असलेल्या शेतक ऱ्याने नापिकी व आपल्याकडे असलेल्या बॅंकेच्या कृषी कर्जापायी विषारी औषध प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केली. संतोषने आज सकाळी १०.३० वाजता विषप्राशन केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मृत संतोष मुंढेचे आईवडील वृध्दापकाळाने २ वर्षांपूर्वी, तर थोरला भाऊ आजारपणामुळे मरण पावल्याने भावासह आपल्या कुटूंबाचा भार एकटय़ा संतोषवर आला होता. त्यातच नापिकी व बॅंकेच्या कर्जापायी कंटाळून त्याने विष प्राशन केल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे. संतोष मुंढे याच्या पश्चात पत्नी, विधवा भावजय, एक मुलगा, मुलगी, पुतण्या व पुतणी, असा आप्तपरिवार आहे. संतोषच्या दुदैवी निधनाने कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.