शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरू असतांनाच वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे ओझे टाकल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी भयंकर त्रस्त झाला आहे, तर या भारनियमनाचा फटका यंदाच्या हंगामातील रब्बी पिकांना मोठय़ा प्रमाणावर बसणार असल्याचे विदारक चित्र भारनियमन व ओव्हेरलोड फिडरच्या समस्यांमुळे सद्यस्थितीत सर्वत्र अनुभवयास मिळत आहे.
यंदाच्या हंगामात या तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके अक्षरश: मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची वेळ आली. मात्र, अतिवृष्टीमुळे सद्य:स्थितीत सर्वच ठिकाणी विहिरींना मुबलक पाणी आहे. परंतु वीज वितरण कंपनीने कृषीसाठी ८ तासांचे भारनियमन सुरू केल्याने सर्वच ठिकाणी मुबलक पाणी असतानाही भारनियमनामुळे पिकांना पाणी मिळेनासे झाले आहे, तर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणच्या कृषी फिडरवर प्रचंड प्रमाणात ग्राहक असल्याचे चित्र आहे. यामुळे अशा कृषी फिडरवर प्रचंड प्रमाणात लोड येत असल्याने कृषीपंप चालणेही कठीण झाले आहे, तर ओव्हरलोडमुळे अनेक वेळा कृषी वीज पुरवठा खंडित होत असल्याने खूपच अल्प वेळ शेतकऱ्यां वीज उपलब्ध होत आहे.
या समस्येमुळे शेतकऱ्यांनी पैसा खर्च करून लागवड, पेरणी केलेले रब्बी पिके विजेअभावी डोळ्यादेखत सुकत आहेत, तर अनेकांनी खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपल्या कृषी क्षेत्रावर भाजीपाल्यांची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. त्यासाठी विहिरीवरून सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यादृष्टीने वीज बिलाचा भरणा करूनही विजेअभावी पाणी मिळत नसल्याने पिके सुकू लागली आहेत. कारखाने व उद्योगांच्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात शासन व वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याची चर्चा यानिमित्ताने ऐरणीवर येत आहे. भारनियमन, ओव्हरलोड फिडर, फिडर अनेक दिवस बंद या समस्यांमुळे शेती सिंचनाचा प्रश्न अधिकच बिकट बनत असल्याने शासनाच्या कृषीविषयक उदासीन धोरणामुळे शासनाच्या व वीज वितरण कपंनीच्या विरोधात हजारो बांधवांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे, एवढे मात्र निश्चित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा