जिल्ह्य़ात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या मुद्यावर विविध राजकीय पक्षांची आंदोलने सुरू असतानाच आता त्यावर राजकारणही तापू लागले आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनी आमदार रवी राणा यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ संबोधले आहे, तर राणा यांची मागणी अवास्तव असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. आंदोलन करण्यासाठी ‘डेअरिंग’ हवे, असे प्रत्युत्तर राणा यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या हाती अजूनही मदत पोहोचलेली नाही. मात्र, हा राजकीय शिमगा चांगलाच रंगला आहे.
काही दिवसांपूर्वी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठेवून आंदोलन केले होते. अटक झाल्यानंतर राणा यांनी जामीन न घेता मध्यवर्ती कारागृहात जाणे पसंत केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात रवी राणा यशस्वी ठरले खरे, पण सरकारकडून भरीव मदत ते अजूनही मिळवू शकलेले नाहीत. जिल्ह्य़ात सोयाबीनच्या पिकाची मोठय़ा प्रमाणावर नासाडी झाली असताना मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांकडून आक्रमक भूमिका घेतली जात नाही आणि सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा मात्र या प्रश्नांसाठी आघाडीवर असतात, हे बिंबवण्यात राणा यांच्या सहकाऱ्यांना यश आले, तरीही आंदोलनाच्या पद्धतीविषयी त्यांच्यावर टीका केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठेवण्याचा अवमानजनक प्रकार रवी राणा यांनी केला असून त्यांनी शेतकरी हिताचा खोटा आव आणणे थांबवले पाहिजे. रवी राणा एकीकडे सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देतात, सर्व फायदे उकळतात आणि दुसरीकडे तुरुंगात जाण्याची ‘नौटंकी’ करतात, अशी टीका खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. रवी राणा यांचे आंदोलन हे नाटकबाजी असल्याचे आमदार अभिजीत अडसूळ यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा खरा कळवळा असेल, तर आधी सत्तारूढ आघाडी सरकारला असलेला पाठिंबा त्यांनी काढून घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. रवी राणा यांचा दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात यायला लागल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी राणा जंग जंग पछाडत आहेत. आनंदराव अडसूळही त्यांच्याकडे संभाव्य बलाढय़ प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक द्वंद्व वाढण्याची चिन्हे आहेत. आपला सरकारला पाठिंबा असला, तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे गुन्हा नाही. यासाठी इच्छाशक्ती आणि धाडस हवे असते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संगनमत करून शिवसेना विरोधी पक्षाचा धर्म विसरली आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तरादाखल केली आहे. अमरावती जिल्ह्य़ात तर शिवसेना झोपेच्या अवस्थेत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
 रवी राणा यांच्या आंदोलनाविषयी बोलताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांचे अभिनंदन केले खरे, पण अवास्तव मागण्या मांडल्याबद्दल त्यांचा वर्गही घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यासाठी अनेक नेते आता सरसावले असताना शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत आणि नेते शाब्दिक चकमकीत व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्य़ात आहे.

Story img Loader