शेतावर नांगर, पाण्यासाठी पायपीट
पैठण तालुक्यातील मुदगलवाडी येथे ४ कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरीत पाणी असूनही ते ना पिण्यास योग्य, ना शेतीसाठी. वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी केल्यानंतर ते पिण्यायोग्य नाही, असे अहवाल प्रदूषण मंडळाकडे देण्यात आले. मात्र, सलग ४ वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही ना कंपन्यांवर कारवाई झाली, ना प्रदूषण थांबले.
परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. कारवाईचा प्रस्ताव ‘मुंबई’ त अडकला असल्याचे अधिकारी सांगतात. आता शेतकऱ्यांनी इरेला पेटत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ‘आम्ही मरून जाऊ, पण तक्रार द्यायला येणार नाही,’ असे निर्वाणीचे कळवून टाकले आहे. सन २०१० मध्ये प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांनी क्रिस्टल केमिकल्स, बी. बी. केमिकल्स, स्टोनोलाइट फार्मास्युटिकल्स, आयसलँड अ‍ॅण्ड केमिकल या कंपन्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंबईच्या कार्यालयाकडे पाठविला. त्यावर काहीच उत्तर आले नाही. प्रदूषण सुरूच आहे. परिणामी टंचाईकाळात गावातील विहिरींमध्ये पाणी असूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
गावातील विहिरीच्या पाण्याचा व खाद्यतेलाचा रंग सारखाच आहे. प्रदूषणाची तीव्रता एवढी आहे की, शेतीला विहिरीचे पाणी दिले तर भोवतालचे गवतसुद्धा करपून जाते. गेल्या १० वर्षांपासून या प्रदूषणाविरोधात शेतकरी विष्णू आसाराम बोडखे लढा देत आहेत. प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे २००२ मध्ये त्यांच्या लक्षात आले. घरी साडेनऊ एकर शेती असणाऱ्या बोडखे यांनी चिकू व मोसंबीची बाग लावली होती. ती जळून गेली. चिकूची झाडे वाढली, पण त्याला फळे लागली नाहीत. असे का, याचा अभ्यास केल्यानंतर प्रदूषण हे त्याचे मुख्य कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याविरोधात लढा देण्यासाठी कंबर कसली. प्रदूषण मंडळातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. उद्योजकांनाही प्रदूषणाची तीव्रता लक्षात आणून दिली. पण कोणीच लक्ष दिले नाही. तक्रार केली की, पाणी तपासणीसाठी एखादा अधिकारी पाठविला जात असे आणि तपासलेल्या पाण्यात ‘अयोग्य’ काहीच नाही, असे अहवाल येत असत. वैतागलेल्या बोडखे यांनी पाण्याची तपासणी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामार्फत करून घेतली. तेव्हा सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराइटचे प्रमाण अतिशय जास्त असल्याने हे पाणी पिण्यासाठी तर नाहीच, पण सिंचनासाठीही अयोग्य असल्याचे अहवाल दिले गेले.
काही खासगी प्रयोगशाळांमध्येही पाण्याची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मात्र हे अहवाल देऊनही काहीच फरक पडला नाही. पाठपुरावा सुरूच राहिला. गेल्या नोव्हेंबरमध्ये बोडखे यांनी ‘या पुढे लिखापढी बंद’ असे प्रदूषण मंडळाला निर्वाणीचे कळवून टाकले. कारखाने त्वरित बंद करा, अशी विनंती करून ते थकले. केवळ बोडखेच नाही, तर भोवतालच्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, पण कोणीच लक्षच दिले नाही.
क्रिस्टल, सर्फलंट व केमिकल्स, स्टोनोलाइट फार्मास्युटिकल्स या दोन कंपन्यांची २५ हजारांची बँक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई प्रादेशिक प्रदूषण मंडळाने मुख्य कार्यालयाकडे केली, तर बी. बी. केमिकल्स व आयसलँड अ‍ॅण्ड केमिकल्स या दोन कंपन्या बंद करण्याची शिफारस केली. हा पत्रव्यवहार तीन वर्षांपूर्वीचा. मुख्य कार्यालयाकडून उत्तर आले नाही, प्रदूषण काही थांबले नाही. आजही विष्णू बोडखे व शेतकरी हैराण आहेत.
या अनुषंगाने प्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘हे प्रकरण गंभीर आहे. त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर केला आहे. तशी कारवाई होणे आवश्यक होती. आता पुन्हा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवून अहवाल घेतला जाईल. ज्यांनी प्रदूषण केले आहे, त्यांच्यावर कारवाई होईल’ असे म्हटले. मात्र, एवढे दिवस ती का झाली नाही, याचे समाधानकारक उत्तर प्रदूषण मंडळातील अधिकाऱ्यांना देता आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा