यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी पहिली उचल नेमक्या किती दराची मागायची याचा पेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर असल्याचे दिसते. अन्य संघटनांनी २८०० ते ३५०० हजार रुपये अशी पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली असल्याने या दरम्यानचा कोणता आकडा निश्चित करावा यावरून खासदार राजू शेट्टी यांची कोंडी होणार असल्याची चर्चा शेतक-यांमध्ये आहे. गतवर्षी तीन हजार रुपयांची पहिली उचल मागितल्यामुळे या वेळी त्याहून अधिक रक्कम मागायची की साखरेचे दर ढासळल्यामुळे दोन पावले मागे यायचे असा प्रश्न पडला आहे. फेसबुकवर व्यक्त झालेल्या शेतक-यांच्या अपेक्षा आणि ऊस-साखर व्यवसायाचे वास्तव याचा समन्वय ठेवून मार्ग काढणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले असले तरी उद्या शुक्रवारी होणाऱ्या १२व्या ऊस परिषदेत ते पहिली उचल किती रकमेची जाहीर करणार याकडे पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो शेतक-यांचे लक्ष वेधले आहे.     
ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन केले जाते. परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी पहिली उचल किती मागणार याकडे शेतक-यांचे चित्त एकवटलेले असते. गतवर्षीच्या हंगामापेक्षा यंदा साखरेचे दर घसरले आहेत. बँकांकडून कारखान्यांना मिळणाऱ्या पूर्वहंगामी कर्जामध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. या दोन्ही बाबी साखर कारखानदारांना सतावत असून त्यांनाही पहिली उचल नेमकी किती द्यायची याचा पेच पडला आहे. हीच बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लागू होईल, असे चित्र आहे.    
शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेनेही त्याची री ओढली आहे. डावे पक्ष व जनता दलाच्या शेतकरी संघर्ष समितीने ३२८० रुपये दर मागितला आहे. तर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी साखर कारखाने किमान २५०० रुपयांचा पहिला हप्ता देऊ शकतात असा मुद्दा मांडला आहे. वेगवेगळय़ा शेतकरी संघटनांच्या मागण्यांमध्ये तब्बल १ हजार रुपयांची तफावत दिसते. अशा स्थितीत खासदार राजू शेट्टी यांना पहिला हप्ता कितीचा मागायचा याचा पेच असल्याचे मत शेतक-यांतून व्यक्त होत आहे. गतहंगामात ३ हजार रुपयांची पहिली उचल त्यांनी मागितली होती. या वर्षी ऊस पीक उत्पादनाच्या बियाणे, खते, इंधन आदी घटकांमध्ये दरवाढ झाली आहे.

परिणामी, त्याचा विचार करून शेट्टी यांनी ३ हजारपेक्षाही अधिक पहिली उचल मागावी अशा प्रतिक्रिया फेसबुकवरून व्यक्त झाल्या आहेत. पहिल्या उचलीसाठी शेतक-यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी यंदा स्वाभिमानीने फेसबुक या सोशल मीडियाचा वापर केला असता तब्बल ४५ हजारहून अधिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या अपेक्षा आणि साखर उद्योगातील वास्तव यांची सांगड घालणे तसे जिकिरीचेच काम आहे. शेट्टी यांनी साखरेचे दर कमी झाले असल्याचे मान्य केले आहे. याचा आढावा घेऊनच ऊस परिषदेमध्ये वास्तववादी मांडणी करणार असल्याने पहिली उचल किती मागावी यावरून आपली कोंडी होणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले.
 ऊस परिषद आणि लोकसभा
आगामी लोकसभेच्या पाश्र्वभूमीवर यंदाची ऊस परिषद होणार असल्याने खासदार शेट्टी यांनी गेल्या महिन्याभरापासून पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात जागोजागी शेतक-यांचे मेळावे, सभा घेतल्या आहेत. त्यामुळे परिषदेला शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार हे स्वाभाविक आहे. शिवाय लोकसभेच्या किमान १० जागा लढविण्याचे संकेत त्यांनी दिले असल्याने संबंधित मतदारसंघातील इच्छुक उमेदवारही आपले शक्तिप्रदर्शन घडवीत अधिक संख्येने शेतकरी उपस्थित कसे राहतील या नियोजनात व्यग्र आहेत. याच मुद्यावरून शेट्टी यांचे विरोधक रघुनाथदादा पाटील यांनी लोकसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून शेट्टी यांनी ऊसदराचे आंदोलन करण्याऐवजी निवडणुकीचा फड रंगविण्यास सुरू केल्याची टीका गुरुवारी केली.

Story img Loader