कापसाचे भाव वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून, कापसाच्या भावामध्ये बाजारात चार हजार रुपयांच्या खाली घसरण झाली आहे. परभणी बाजार समिती कार्यक्षेत्रात ३ हजार ९४० रुपये दराने कापसाची खरेदी सुरू होती. आतापर्यंत बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ४० हजार क्िंवटल कापसाची खरेदी झाली.
यंदा पावसाने ताण दिल्याने कापसाचे उत्पादन काही प्रमाणात घटल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच कापसाला अजून तेजी आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुरुवातीला कापसाचा भाव ४ हजार २०० रुपयांपर्यंत गेला होता. आता मात्र भाव झपाटय़ाने घसरू लागले आहेत. सुरुवातीला भावात घसरण झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणला नव्हता. किमान ५ हजार रुपयांपर्यंत भाव गेल्यानंतर कापूस विकू, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना सध्या मात्र मोठा धक्का बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून कापसाचा भाव ३ हजार ९०० रुपयांच्या आसपास अडून आहे. चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा फटका आहे.
सीसीआयची खरेदी सुरू होत नाही तोवर कापूस विकायचा नाही, असे अनेक शेतकऱ्यांनी ठरवले होते. सीसीआयने खुल्या स्पर्धेत कापूस खरेदी सुरू केली असती, तर शेतकऱ्यांनी कापूस सीसीआयला घातला असता, मात्र सध्या सीसीआयची खरेदीही केंद्र सरकारच्या हमीभावावरच चालली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कापूस एकाधिकार योजनेची काही खरेदी केंद्रे जिल्हय़ात सुरू असली, तरी या केंद्रांवर शुकशुकाट आहे. गेल्या आठवडय़ात सरकारची व खासगी खरेदी यात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांचे अंतर होते. आता हे अंतर जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असून, याच पद्धतीने कापूस दरात घसरण होत राहिली तर सीसीआय व कापूस पणन महासंघाकडेच कापूस घालण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरणार नाही.
एकीकडे कापसाचे भाव कोसळत असताना वेचणीचे दर मात्र वाढले आहेत. बीटी वाणाचा कापूस एकाच वेळी सर्वत्र फुटत असल्याने व त्याच्या मोजक्या वेचण्या होत असल्याने ग्रामीण भागात मजुरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
 हंगामाच्या सुरुवातीला पाच रुपये प्रतिकिलो वेचणीचा दर होता. हळूहळू त्यात वाढ झाली. गेल्या दोन आठवडय़ांत अनेक ठिकाणी सात रुपये किलोने कापसाची वेचणी झाली. काही ठिकाणांहून वेचणीसाठी मजूर महिलांची वाहनाद्वारे ने-आण करावी लागत आहे.
सध्या शेतकऱ्याला कापूस वेचणीचा दर हा प्रतिकिलोला दहा रुपये पडत आहे. कापसाच्या किमतीच्या एकचतुर्थाश रक्कम निव्वळ वेचणीसाठी खर्च होते. हा पैसा शेतकऱ्यांना नगदी द्यावा लागत आहे. त्यानंतर बी-बियाणे, खते, कीटकनाशके असा खर्च काढला, तर कापूस उत्पादक शेतकरी घाटय़ातच येण्याची चिन्हे आहेत. यंदा बाजारपेठेतील दराच्या घसरणीने कापूस उत्पादक मात्र हवालदिल झाले आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा