फेब्रुवारीतील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देतांना मोठी गफलत झाल्याची ओरड करत तालुक्यातील साकुरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. या प्रकरणी चौकशी करून भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
गारपिटीमुळे साकुरी येथे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असले तरी भरपाई मात्र अल्प प्रमाणात देण्यात आली आहे. त्यातही धनदांडग्याना झुकते माप देतांना गरीब शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली. पडीत जमीन असणारे तसेच विहीर बागायत नसलेल्यांना फळबाग पिकांची भरपाई देण्यात आली. धारण केलेल्या क्षेत्रापेक्षा काहींना जादा मदत दिली गेली तर ज्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या अशा लोकांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली. गावातील नुकसानीचा पंचनामा स्थानिक ग्रामसेवकाने केला होता. वंचित राहिलेल्या लोकांनी या संदर्भात त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सर्वच नुकसानग्रस्तांच्या पिकांचा पंचनामा करून यादी तहसील कार्यालयाला सादर केल्याचा दावा करून त्यांनी हात वर केले. त्यामुळे साकुरीकरांनी गेल्या आठवडय़ात ही बाब तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून देत ३० जूनपर्यंत ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र या कार्यालयाने कोणतीच दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उपोषणात दिगंबर ठोके, जिभाऊ शेरमळे, कैलास इंगळे, देवराम कुर्डे आदी सामील झाले.

Story img Loader