काही अपवाद वगळता सलग दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलला सुमारे १२०० रूपयांनी घसरले आणि शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. पिंपळगाव बसवंत येथे तर संतप्त शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद पाडले. परंतु, नंतर बाजार समितीने हस्तक्षेप केल्यावर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. दुसरीकडे नामपूर उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी सध्याची दोलायमान स्थिती लक्षात घेऊन पुढील तीन दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर राज्यातून पुरेशी उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण देशाची कांद्याची गरज भागविण्याची भिस्त मध्यंतरी नाशिकवर आली होती. देशांतर्गत मागणी वाढल्याने काही दिवसांपूर्वीच उन्हाळ कांद्याने सहा हजारांचा टप्पा ओलांडला. पावसामुळे लाल कांद्याचे आगमन लांबणीवर पडल्याने कांद्याला अक्षरश: सोन्याचे भाव प्राप्त झाले. उन्हाळ कांद्याची घटणारी आवक आणि पावसामुळे लाल कांद्याचे लांबलेले आगमन या कैचीत सापडलेल्या घाऊक बाजारात कांद्याने हंगामातील सर्वोच्च भावाची नोंद केल्यानंतर त्याचा प्रवास झपाटय़ाने खालच्या दिशेने होऊ लागला आहे. प्रति क्विंटलला सहा हजार रूपयांच्या पुढे गेलेल्या कांद्याचे भाव तीन दिवसात दीड हजार रूपयांनी खाली आले.
चांगला भाव मिळेल या आशेने ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला, त्यांच्यावर नुकसान सोसण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या घडामोडींचे पडसाद उमटत आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाव कोसळले. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत लिलाव बंद पाडले. आवक तुरळक असूनही भाव कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात १२०० रूपयांनी घसरण झाली. नामपूर उप बाजार समितीत प्रति क्विंटलला ४६५० ते ४२०० रूपये असा भाव मिळाला. या ठिकाणी कांदा दरात मोठी घसरण झाली आहे.
दोन दिवसात कांदा दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या कारणावरून बाजार समित्यांमधील वातावरण बदलले. ही बाब लक्षात घेऊन नामपूर उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार व सोमवार या दिवशी बाजार बंदच राहत असल्याने या ठिकाणी तीन दिवस कांदा लिलाव होणार नाहीत. सध्या कांद्याच्या भावाची दोलायमान स्थिती असून दक्षिणेकडून लाल कांद्याची आवक होऊ लागल्याने भाव खाली येत आहे. परंतु, शेतकरी ही बाब कितपत समजावून घेतील याबद्दल व्यापारी वर्गात संभ्रमावस्था दिसते.
दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मते भाव खाली येत असल्याने व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे बचावात्मक पवित्रा घेतला आहे. स्थानिक पातळीवर जादा भावाने खरेदी केलेल्या कांद्याला देशातील बाजारात तितका भाव न मिळाल्यास नुकसान होईल या भीतीने त्यांनीही खरेदीसाठी हात आखडता घेण्यात सुरूवात केल्याचा आरोपही केला जात आहे. नवीन कांदा बाजारात येताना हे भाव आणखी खाली येतील, अशी भीतीही शेतकऱ्यांना वाटत आहे.

Story img Loader