बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा
गुळाची विक्री केल्यानंतर आडत्याला पैसे उशिरा मिळतात, या कारणामुळे तब्बल ४२ दिवसानंतर शेतक ऱ्यांना पैसे मिळतात. या प्रकरणी शेतकरी संघटनेने बाजार समितीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
लातूर बाजारपेठेत शेतीमाल विक्री झाल्यानंतर त्याच दिवशी मालाचे पैसे दिले जातात. त्यामुळे कर्नाटक व आंध्र प्रांतातील शेतकरीही लातूरच्या बाजारपेठेत आपला माल विक्रीस आणतात. गुळाच्या बाबतीत मात्र आडत्याकडून शेतक ऱ्यांची नाडवणूक केली जात आहे. शेतक ऱ्यांनी आडत्याकडे गूळ दिल्यानंतर तो आडते विक्री करतात. त्यांना त्याचे पैसे उशिरा मिळत असल्याची सबब सांगून तब्बल ४२ दिवसांनी पैसे दिले जातात. दरवर्षी शेतकरी लग्नसराईत नगदी पैशाची गरज लक्षात घेऊन आडतीला गूळ घालतो. आडत्यांना कमिशनपोटी २ टक्के शेतक ऱ्याला द्यावे लागतात. नगदी पैसे पाहिजे असतील, तर आडते पुन्हा २ टक्के वेगळे कपात करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन कायदा १९६३ च्या खरेदी-विक्री नियमावलीनुसार शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत कमिशन एजंटने शेतक ऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. २४ तासांत पैसे न दिल्यास बाजार समितीने संबंधित आडत्यांवर कायदेशीर कारवाई करून त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून शेतक ऱ्याला बाजार समितीने पैसे देणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. असे असताना बाजार समिती प्रशासन काहीही करीत नाही. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी बाजार समितीच्या सचिवांना या प्रकरणी त्यांनी लक्ष न घातल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Story img Loader